जिगरबाद नवाल्नी अॅक्शनमध्ये; जिन्याच्या पायऱ्या उतरतानाचे छायाचित्र इन्स्टावर प्रसिद्ध

जिगरबाद नवाल्नी अॅक्शनमध्ये; जिन्याच्या पायऱ्या उतरतानाचे छायाचित्र इन्स्टावर प्रसिद्ध

मॉस्को - रशियातील जिगरबाज राजकीय विरोधक अॅलेक्सी नवाल्नी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. जिन्याच्या पायऱ्या उतरतानाचे छायाचित्र त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. नवाल्नी यांच्यावर बर्लिनमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना कृत्रिम प्राणवायूची गरज नसून आता ते नेहमीसारखे श्वसन करू शकतात, असे पाच दिवसांपूर्वी डॉक्टरांनी जाहीर केले होते.

नवाल्नी यांनी समर्थक तसेच चाहत्यांसाठी एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गेले कित्येक आठवडे मला वैद्यकीय पद्धतीने बेशुद्धावस्थेत ठेवण्यात आले होते. मला कृत्रिम प्राणवायू पुरवावा लागत होता. तेव्हाच्या तुलनेत सध्याचा त्रास अगदी किरकोळ वाटतो. याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी मी लोकांना ओळखू शकत नव्हतो. मला बोलताही येत नव्हते.

गेल्या आठवड्याच्या प्रारंभी नवाल्नी यांनी रुग्णालयात कुटुंबीयांबरोबरील छायाचित्र पोस्ट केले होते. बरे होताच ते रशियाला परतणार असल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले होते.

रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक असलेले नवाल्नी विमानात अत्यवस्थ झाले. सायबेरियातील रुग्णालयात बेशुद्धावस्थेत असतानाच त्यांना विमानाने बर्लिनमध्ये हलविण्यात आले. रासायनिक अस्त्रातील नोव्हीचोक या प्राणघातक रसायनामुळे त्यांना विषबाधा झाल्याचे आढळून आले. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तीन देशांमधील प्रयोगशाळांत तसेच निष्कर्ष आल्याचे जर्मनीने जाहीर केले. याप्रकरणी रशियाने खुलासा करावा, अशी मागणी जर्मनीसह काही पाश्चिमात्य देशांनी केली आहे.

नोव्हीचोकचे अंश आढळले
दरम्यान, विमानात बसण्यापूर्वी नवाल्नी सायबेरियातील टोम्स्क शहरातील हॉटेलमध्ये थांबले होते. तेथील पाण्याच्या बाटलीवर नोव्हीचोकचे अंश आढळल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले. हॉटेलच्या तपासणीत आरोग्य आणि निर्जंतुकीकरणाशी संबंधित अनेक बाबींचे उल्लंघन झाल्याचेही तपासणीत आढळून आले. त्याबद्दल हॉटेल व्यवस्थापनाला 820 डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माझी बरे होण्याची प्रक्रिया कशी सुरू आहे, हे तुम्हाला सांगू इच्छितो. हा मार्ग सुस्पष्ट असला तरी प्रदीर्घ आहे. फोन वापरताना, पाणी भांड्यात ओतताना किंवा जिने चढताना मला अजूनही त्रास होतो. हातांमधील ताकद कमी पडते तसेच पाय थरथरतात.
 - अॅलेक्नी नवाल्नी

नवाल्नी कोणत्या परिस्थितीत आजारी पडले, याची आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशी झाली पाहिजे. संयुक्त राष्ट्रे किंवा युरोपीय मंडळ यांच्या कार्यकक्षेअंतर्गत हे होऊ शकते.
- नॉर्बर्ट रोएटजेन,  जर्मनीच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com