'अलीबाबा'चे जॅक मा कुठं गेले ? गेल्या दोन महिन्यांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता

सकाळ ऑनलाइन टीम
Monday, 4 January 2021

जॅक मा चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर झालेल्या वादानंतर मागील दोन महिन्यांपासून दिसलेच नाहीत.

नवी दिल्ली- जगातील तिसरी सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि अलीबाबा समूहाचे मालक जॅक मा मागील दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. चीनमधील तंत्रज्ञान उद्योगावर वर्चस्व असणारे जॅक मा चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर झालेल्या वादानंतर मागील दोन महिन्यांपासून दिसलेच नाहीत. जॅक मा यांनी मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये शांघाय येथे झालेल्या एका कार्यक्रमात सरकारी बँकांवर तिखट शब्दांत टीका केली होती. 

जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी आदर्श असलेल्या जॅक मा यांनी जागतिक बँकिंग नियमांना 'ज्येष्ठ लोकांचा क्लब' असल्याचा टोला लगावला होता. त्यांच्या या भाषणानंतर चीनमधील सत्तारुढ कम्युनिस्ट पक्ष संतापला होता. जॅक मा यांची टीका ही कम्युनिस्ट पक्षावरील टीका समजण्यात आली होती. त्यानंतर जॅक मा यांच्यामागे शुक्लकाष्ट लागले आणि त्यांच्या उद्योगांवर अनेक बंधने लादण्यास सुरुवात करण्यात आली. 

हेही वाचा- जगात प्रचंड गतीने पसरत आहे आणखी एक महामारी; इबोलाचा शोध लावणाऱ्या डॉक्टरचा इशारा

नोव्हेंबर महिन्यात चिनी अधिकाऱ्यांनी जॅक मा यांना जोरदार झटका देत त्यांच्या अँट समूहाचे 37 अब्ज डॉलरचे आयपीओ निलंबित केले. वॉल स्ट्रिट जनरलच्या अहवालानुसार जॅक मा यांच्या अँट ग्रूपचा आयपीओ रद्द करण्याचा आदेश थेट चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून आला होता. त्यानंतर जॅक मा यांना चीनच्या बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली. जोपर्यंत अलीबाबा समूहाविरोधातील चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत जॅक मा यांनी चीन सोडू नये, असा आदेश देण्यात आला होता. 

त्यानंतर जॅक मा आपला टीव्ही शो 'आफ्रिका बिझनेस हिरोज'मधून नोव्हेंबरपासून रहस्यमयरित्या बेपत्ता झाले. इतकेच नव्हे तर या शोमधून त्यांचा फोटोही हटवण्यात आला.  जॅक मा सिड्यूलच्या वादामुळे आता परीक्षकांच्या पॅनला हिस्सा नसतील, असे अलीबाबा समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले. 

हेही वाचा- कोरोना लस टोचून घेतलेली महिला डॉक्टरच आयसीयूत

चीनमध्ये सरकारविरोधात भूमिका घेणाऱ्यांचा आवाज दाबला जाण्याची ही पहिली वेळ नाही. कम्युनिस्ट सरकारविरोधात भूमिका घेणाऱ्यांना चीनमध्ये मोठ्या संख्येने नजरकैद केले जाते. यापूर्वी शी जिनपिंग यांच्यावर टीका करणारे उद्योगपती रेन झिकियांग बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांना 18 वर्षांसाठी कारागृहात पाठवले होते. चीनचे आणखी एक अब्जाधीश शिआन जिआनहुआ 2017 पासून नजरकैदेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alibabas Jack Ma Mysteriously missing from the last two months