भारतानंतर अमेरिकेचा चीनला दणका; 38 बड्या कंपन्यांवर बंदी

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 18 August 2020

अमेरिकेने चीनच्या हुवेई या कंपनीवरील निर्बंध आणखी कडक केले आहेत.

वॉशिंग्टन: अमेरिकेने चीनच्या हुवेई या कंपनीवरील निर्बंध आणखी कडक केले आहेत. दूरसंचार उपकरणे बनविणाऱ्या या कंपनीला अमेरिकी तंत्रज्ञानापासून वंचित ठेवून महत्त्वाचे घटक न मिळू देण्याचा हेतू यामागे आहे. ही कंपनी आमच्यावर पाळत ठेवत असल्याने तिची उपकरणे नकोत, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. इतर कोणता देश ती वापरत असल्यास आम्ही माहिती शेअर करणार नाही, असेही ते म्हणाले. 

कोविड-19 विरोधातील लढाई जिंकतोय भारत? 5 चांगल्या बातम्यांनी होतंय स्पष्ट

अमेरिकेच्या वाणिज्य विभागाच्या नव्या नियमांमुळे हुवेईला स्वस्तातील तंत्रज्ञान मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. गेल्या वर्षी अमेरिकेने हुवेईवर तंत्रज्ञानासह गुगल म्युझिक व इतर स्मार्टफोन सेवा वापरण्यावरही निर्बंध आणले होते. मात्र, हुवेई इतर कंपन्यांचे तंत्रज्ञान वापरून निर्बंधांना जुमानत नसल्याने आणखी कडक निर्बंधांची गरज होती, असे वाणिज्य विभागाने स्पष्ट केले. आता नवीन नियमामुळे हुवेईला अमेरिकी कंपन्यांचे घटक वापरून बनविलेले चिप्सही वापरता येणार नाहीत. 

नव्या नियमामुळे हुवेईला अमेरिकेच्या सॉफ्टवेअर किंवा अमेरिकी उपकरणांच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका व चीनमध्ये तंत्रज्ञान व सुरक्षेवरून वाढणाऱ्या तणावाच्या केंद्रस्थानी हुवेई आली आहे. ‘टिकटॉक’ व ‘वुईचॅट’ या चीनी ॲपवरही अमेरिकेने बंदी घातली आहे. हुवेईने मात्र आपण चीनसाठी हेरगिरी करण्याचे आरोप फेटाळले आहेत. चीनी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा वापर करून अमेरिका प्रतिस्पर्धी तंत्रज्ञान कंपन्यांना नामोहरम करत असल्याचा आरोप केला आहे. 

"डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदासाठी अयोग्य उमेदवार"

काय परिणाम होईल? 

अमेरिकेच्या निर्बंधामुळे हुवेई चांगलीच अडचणीत आली आहे. कंपनीला स्मार्टफोन बनविण्यासाठी प्रोसेसर चिप्सची कमतरता भासत असून स्वत:च्या प्रगत चिप्सचे उत्पादनही थांबवावे लागू शकते. 

अमेरिकेच्या सुरक्षा धोरणात चीनबरोबरच्या तंत्रज्ञानाला केंद्रस्थानी ठेवले आहे. हुवेईबद्दल सुरक्षेचे अनेक प्रश्न अमेरिकेने उपस्थित केले असून ट्रम्प प्रशासन त्याविरुद्ध कठोर उपाय योजत आहे. हुवेई या प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे देऊ शकत नाही, असं अमेरिका-चीन संबंधांची अभ्यासक एलिसा कानिया म्हणाल्या आहेत.
  
इतर ३८ संलग्न कंपन्यांवरही बंदी 

अमेरिकेने हुवेईबरोबरच या कंपनीशी संलग्न ३८ कंपन्यांनाही संवेदनशील तंत्रज्ञान देण्यावर बंदी घातली आहे. अमेरिका युरोपमधील काही देशांबरोबर एकत्रितरीत्या हुवेईवर आर्थिक निर्बंधांची मोहीम चालवत आहे. या चीनी कंपनीला अत्याधुनिक वायरलेस नेटवर्क मिळू न देण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america Ban 38 large companies on china