अमेरिकेचा मैत्रीचा दावा खोटा? भारताची पाकिस्तान, सीरियासोबत केली तुलना

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 26 August 2020

भारतासोबत मैत्रीचा दावा करणाऱ्या अमेरिकेने आपल्या नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

वॉशिंग्टन- भारतासोबत मैत्रीचा दावा करणाऱ्या अमेरिकेने आपल्या नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला दिला आहे. भारतातील वाढणारे कोरोनाचे संकट, गुन्हेगारी आणि दहशतवाद असे कारण यामागे सांगितलं आहे. एवढेच नाही तर अमेरिकेने भारत प्रवासासाठी 4 रेटिंग निश्चित केली आहे. रेटिंग 4 ला सर्वात वाईट मानलं जातं. या श्रेणीमध्ये भारताशिवाय युद्धग्रस्त सीरिया, दहशतवादाचे केंद्र असलेला पाकिस्तान, इराण, इराक आणि यमन या देशांचा समावेश होतो. 

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याशिवाय भारतात गुन्हेगारी आणि दहशतवाद फौफावला आहे. त्यामुळे अमेरिकी नागरिकांनी भारताची यात्रा करु नये, असं अमेरिकी सरकारने सांगितलं आहे. अमेरिकेने जाहीर केलेल्या आपल्या सूचनांमध्ये महिलांविरोधात वाढणारे गुन्हे आणि कट्टरतावाद याचांही उल्लेख केला आहे. दुसरीकडे, इंडियन टूरिझम अँड हॉस्पिटॅलीटी संघटनेने (FAITH) भारत सरकारला याप्रकरणात लक्ष घालण्यास सांगितलं आहे. भारत सरकारने अमेरिकी सरकारवर ट्रॅव्हल अॅडव्हायझरी बदलण्यासाठी दबाव आणावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

रशियाच्या व्हॅक्सिनसाठी भारताची तयारी? वाचा आरोग्य मंत्रालय काय म्हणते 

संघटनेनं म्हटलं की, भारत सरकारने याला प्राथमिकतेने घेऊन या मुद्दाला उचलले पाहिजे, कारण यामुळे आपल्या देशाची नकारात्मक प्रतिमा बनत आहे. पर्यटन क्षेत्र कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे गंभीर संकटातून जात आहे. असे असले तरी भारत सरकार पर्यटन क्षेत्र सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेने 23 ऑगस्ट रोजी ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जाहीर केल्या होत्या. यात भारताशिवाय सीरिया, यमन, इराण आणि इराक अशा हिंसा प्रभावित देशांचा समावेश केला आहे. 

भारत-पाकिस्तान सीमेवर न जाण्याचा दिला इशारा

भारताच्या पर्यटन क्षेत्रासाठी अमेरिकी पर्यटक महत्वाचे आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेतून येणारे पर्यटक अन्य देशांच्या तुलनेत अधिक काळ भारतात राहतात. अमेरिकी पर्यटक सरासरी  29 भारतात राहतात, तर अन्य देशाचे पर्यटक सरासरी 22 दिवस येथे राहतात. त्यामुळे भारत सरकारने अमेरिकी सरकारवर दबाव आणावा, त्यामुळे पर्यटन क्षेत्राला चालणा मिळेल, असं फेथने म्हटलं आहे.  

भारतात कोरोना का वाढतोय? ICMR ने सांगितलं कारण

अमेरिकेने आपल्या ट्रॅव्हल अॅडव्हायझरीमध्ये इशारा दिला आहे की, कोरोना महामारीमुळे देशाच्या सीमा केव्हाही बंद होऊ शकतात. त्यामुळे प्रवासावर निर्बंध येतील. पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो. अमेरिकेने विशेष करुन जम्मू-काश्मीर आणि भारत-पाकिस्तान सीमेवर न जाण्याची चेतावणी दिली आहे. भारताला पाकिस्तान आणि सीरियाच्या श्रेणीत टाकणे वाईट असल्याचं फेथने म्हटलं आहे. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america Comparison of India with Pakistan Syria