अमेरिकेत कोरोना रूग्ण वाढीचा वेग मंदावला | Corona Patient | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients
अमेरिकेत कोरोना रूग्ण वाढीचा वेग मंदावला

अमेरिकेत कोरोना रूग्ण वाढीचा वेग मंदावला

वॉशिंग्टन : जगभरात ओमिक्रॉन संसर्गाचा (Omicron Variant) वाढता धोका लक्षात घेता अमेरिका आणि युरोपात गेल्या चोवीस तासातील कोरोना रुग्णवाढीच्या (Corona Patient) संख्येत घसरण झाली. युरोपात शनिवारी ७. ३९ लाख कोरोनाबाधित झालेले असताना रविवारी हीच संख्या ३.६८ लाखांवर आली. तसेच अमेरिकेत शनिवारी २.३९ लाख जणांना कोरोनाची लागण झाली असता रविवारी ही संख्या १.८५ लाखांवर आली. गेल्या चोवीस तासात ब्रिटनमध्ये १.३७ लाख, इटलीत ६१ हजार, फ्रान्समध्ये ५८ हजार आणि कॅनडात ३५ हजार रुग्णांना बाधा झाली आहे. जगभरात एकूण चोवीस तासात ८.२८ लाख जणांना कोरोना झालेला असताना ३ हजार ८८ जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाचे लक्षणे आढळून आल्याने त्यांची काल चाचणी करण्यात आली. त्यांचा पॉझिटिव्ह अहवाल आला असून त्याची माहिती अध्यक्ष ज्यो बायडेन यांना देखील देण्यात आली आहे. अमेरिकेत गेल्या चोवीस तासात कोरोनाची १ लाख ८५ हजार १२२ रुग्णांना लागण झाली आहे.

हेही वाचा: चंद्रपूर : चालबर्डी परिसरात आढळला वाघिणीचा मृतदेह

फ्रान्समध्ये कडक निर्बंध

बिअर बार आणि रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताना व्हॅक्सिन पास आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच सार्वजनिक ठिकाणी जाण्यास परवानगी दिली जात आहे. परंतु ज्यांनी लसीचे दोन डोस घेतलेले नाहीत, त्यांच्यावर दंड बसवण्याची तयारी केली जात आहे. यासाठी सरकारने विधेयक देखील आणले आहे.

अरब देशात कोरोना रुग्ण वाढले

अरब देशात कडक निर्बंध असूनही कोरोना संसर्गाचा प्रसार वाढत चालला आहे. सौदी अरेबियात २४ तासात एक हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. दुसरीकडे यूएईमध्ये हा आकडा अडीच हजाराचा आहे. सौदीत वाढते रुग्ण पाहता काल आरोग्य मंत्रालयाने बैठक बोलावली होती. ऑगस्टनंतर प्रथमच एक दिवसात रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा गाठला आहे. सौदी अरेबिया आणि यूएईमध्ये ओमिक्रॉनबाधितांची संख्या मात्र उघड केलेली नाही. वास्तविक दोन्ही देशात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण हा डिसेंबरमध्ये सापडला होता. सप्टेंबरनंतर सौदीतही शंभरापेक्षा अधिक रूग्ण आढळून येत नव्हते. परंतु आता वाढ होत आहे. त्यामुळे यूएईने लस न घेतलेल्या लोकांना बाहेर फिरण्यावर बंधने आणली आहेत. दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना आता बूस्टर डोस दिला जाणार आहे.

हेही वाचा: पुणे : महापालिका सोमवारपासून सुरु करणार गुंठेवारीची नोंदणी

इस्राईलमध्ये गर्भवतीला ‘फ्लोरोना’

जेरुसलेम : ओमिक्रॉनच्या अवतारात जगात कोरोनाचे संकट पुन्हा गंभीर होत असतानाच इस्राईलमध्ये ‘फ्लोरोना’चा संसर्ग आढळला आहे. या आजाराचा एक रुग्ण देशात असल्याचे येथील सरकारने नुकतेच जाहीर केले आहे. फ्लोरोना हा कोरोना विषाणूचे ‘अल्फा’, ‘डेल्टा’ व ओमिक्रॉन या उत्प्रेरित प्रकार नसून कोरोना व इन्फ्लूएंझा विषाणूचा एकाचवेळी झालेला संसर्ग आहे.

इस्राईलमधील ‘वाय नेटन्यूज’ (Ynetnews) या संकेतस्थळावर या दुहेरी संसर्गाची माहिती दिली आहे. पेटा टिकव्हा येथील राबीन वैद्यकीय केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला ‘फ्लोरोना’ची लागण झाल्याचे यात म्हटले आहे. या गर्भवतीने रोगविरोधक लस घेतलेली नव्हती, असा दावा रुग्णालयाने केला आहे. हा संसर्ग सौम्य असून आरोग्य मंत्रालय तपास करीत असल्याचे सांगण्यात आले. कोरोना व इन्फ्लूएंझा या दोन विषाणूंचा संयोग झाल्यास गंभीर आजार होऊ शकतो, का याची चाचपणी सुरू आहे. अन्‍य काही रुग्णांनाही दोन विषाणूंची संसर्ग झाला असण्याची व अद्याप त्याचे निदान झाले नसावे, अशी शक्यता आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top