अमेरिकेत 24 तासांत 70 हजारहून अधिक रुग्ण; अखेर ट्रम्प मास्क वापरण्यास 'राजी'

सुशांत जाधव
Saturday, 11 July 2020

ट्रम्प यांनी लॉकडाउनचा विरोध केला होता. एवढेच नाही तर मास्क घालणेही त्यांनी टाळले होते. मी स्वत:ला मास्क घालून पाहू शकत नाही, असे खुद्द ट्रम्प यांनी म्हटले होते.

महासत्ता असलेल्या अमेरिकेतील कोरोना विषाणूचा कहर थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. जगभरातील अनेक राष्ट्राला घायाळ करुन सोडणाऱ्या कोरोना विषाणूने अमेरिकेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमेरिकेत दिवसागणिक समोर येणारा कोरोनाग्रस्तांचा आकडा हा थक्क करणारा आहे. मागील 24 तासांत याठिकाणी 70 हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. या नव्या आकड्यांसह अमेरिकेतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आता  32 लाख 91 हजार 786 वर पोहचला आहे. राष्ट्रात अवघ्या 24 तासांत 70 हजार नवे रुग्ण आढळल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी अखेर मास्क वापरण्याचा निर्णय घेतलाय. एका दौऱ्यासाठी त्यांनी मास्क घालण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त आहे. 

कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखांवर; पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण संपूर्ण यादी एका क्लिकवर...

अमेरिकेत कोरोनामने जवळपास 1 लाख 36 हजार 671 लोकांचा बळी घेतला आहे. याठिकाणी 14 लाख 60 495 लोकांनी कोरोनावर मातही केली आहे. देशात प्रतिदिन 60 हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा कहर वाढत असतानाही ट्रम्प यांनी मास्क घालणे टाळले होते. याची जोरदार चर्चाही रंगली. मात्र शनिवारी आयोजित दौऱ्यात ट्रम्प यांनी मास्क घातल्याचे पाहायला मिळणार आहे. ते वॉल्टर रीड मिलेट्री रुग्णालयातील सैनिकांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान ते मास्क घालणार आहेत.  ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजवरील मुलाखतीमध्ये यासंदर्भात माहिती दिली होती.  'मी वॉल्टर रीडमध्ये काही  महान सैनिकांची भेट घेणार आहे. यावेळी कोविड 19 च्या लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या आरोग्य सेवकांचीही यावेळी भेट घेणार असून याठिकाणी जाताना मला मास्क घालावेच लागेल, असे त्यांनी सांगितले. तुम्ही एखाद्या रुग्णालयाला भेट देत असाल तर मास्क घालावाच लागेल, यावरही त्यांनी जोर दिला.  

TikTok चीनवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत? कंपनी करतेय 'हा' विचार

अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकड्यामुळे ट्रम्प यांना टिकेचा सामना करावा लागत आहे. मात्र ते सुरुवातीपासून आपल्या वक्तव्यावर ठाम राहत यावर प्रत्युत्तर देत आहेत. इतर राष्ट्रांच्या तुलनेत अमेरिकेत मोठ्या प्रमाणात चाचणी होत असल्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा अधिक वाटतो, अशी भूमिका त्यांनी वेळोवेळी घेतली आहे. ट्रम्प यांनी लॉकडाउनचा विरोध केला होता. एवढेच नाही तर मास्क घालणेही त्यांनी टाळले होते. मी स्वत:ला मास्क घालून पाहू शकत नाही, असे खुद्द ट्रम्प यांनी म्हटले होते. पण आता त्यांनी मास्क घालण्याची तयारी दर्शवली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america coronavirus cases cross 70 thousand donald trump agrees to wear a mask