esakal | जगातील सर्वाधिक शक्तीशाली नेत्यांची होणार भेट
sakal

बोलून बातमी शोधा

JOE BIDEN PUTIN

बायडेन हे ‘जी-७’ गटांतील देशांच्या परिषदेसाठी ब्रिटनमध्येही जाणार असून ते बेल्जियम येथे ‘नाटो’च्या परिषदेतही सहभागी होणार आहेत.

जगातील सर्वाधिक शक्तीशाली नेत्यांची होणार भेट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन/ मॉस्को- हेरगिरीसह निवडणूकांमधील हस्तक्षेप अशा विविध मुद्द्यांवरून अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंध ताणले गेले असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकचे अध्यक्ष ज्यो बायडेन (america joe biden) आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी पुढील महिन्यात जीनिव्हा येथे थेट भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. १६ जूनला ही बैठक होणार असून अध्यक्षपदावर आल्यानंतरचा बायडेन यांचा हा पहिलाच विदेश दौरा असेल. बायडेन हे ‘जी-७’ गटांतील देशांच्या परिषदेसाठी ब्रिटनमध्येही जाणार असून ते बेल्जियम येथे ‘नाटो’च्या परिषदेतही सहभागी होणार आहेत. (america joe biden russia vladimir putin will meet in geneva)

बायडेन आणि पुतीन यांच्यातील चर्चेवेळी रशियाची युक्रेनमधील कारवाई, लिथुनियाला जाणारे विमान बळजबरीने दुसरीकडे वळविणे, कोरोना संसर्गाविरोधातील लढाई अशा विविध मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. अर्थात, या बैठकीसाठी कोणतीही पूर्वअट ठरविण्यात आलेली नाही, असेही ‘व्हाइट हाऊस’च्या माध्यम प्रतिनिधी जेन साकी यांनी स्पष्ट केले. पुतीन आणि बायडेन यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष लागणार असले तरी यातून फार काही निष्पन्न होण्याची स्वत: बायडेन यांना अपेक्षा नाही. रशियाबरोबर चांगले संबंध ठेवण्यासाठी बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी विशेष प्रयत्न केले होते. सध्याच्या परिस्थितीत संबंध पूर्ववत होणे शक्य नसल्याचे बायडेन यांचे मत आहे. रशियाने मात्र या बैठकीबाबत प्रतिक्रिया देताना, अमेरिकेबरोबरील संभाव्य संबंधांबाबत आणि इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा: DRDO च्या 10 हजार 2DG औषधाची दुसरी खेप उद्या होणार रवाना

हेही वाचा: "मोदी सरकारने उत्तर कोरियालाही टाकलं मागे"

चर्चेला निर्बंधांची किनार

ज्यो बायडेन यांनीच व्लादीमिर पुतीन यांची थेट भेट घेण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्यात ठेवला होता. अमेरिकेने विविध मुद्द्यांवरून रशियाच्या अनेक अधिकाऱ्यांवर निर्बंध जारी केले आहेत. काही महिन्यांपूर्वी दोन्ही देशांचे राजदूतही माघारी आले होते. त्याआधी काही राजनैतिक अधिकाऱ्यांची एकमेकांनी हकालपट्टीही केली होती. याशिवाय, गेल्याच आठवड्यात युरोपीय नैसर्गिक वायू पाइपलाइन प्रकल्पातील रशियाच्या वादग्रस्त कामावरून अमेरिकेने काही रशियन कंपन्यांवर निर्बंध लागू केले असून येत्या काही दिवसांत आणखी निर्बंध लादले जाणार आहेत. याशिवाय, निवडणूकीतील हस्तक्षेप, पुतीनविरोधक अलेक्सी नवाल्नी यांना अटक या मुद्द्यांवरूनही वाद आहेत. या पार्श्वभूमीवर बायडेन आणि पुतीन यांची भेट होणार आहे.