Video : 'अण्वस्त्रे तयार केली तर बघाच!' ट्रम्प इराणवर भडकले

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 जानेवारी 2020

अमेरिका इराणला कदापि अण्वस्त्रे तयार करू देणार नाही. तसा प्रयत्न केल्यास इराणवर कडक आर्थिक निर्बंध लादले जातील, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला. 

वॉशिंग्टन : इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकेच्या एकाही सैनिकाला इजा पोचलेली नाही, असा दावा करत सध्या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाला इराणच जबाबदार आहे, असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. इराणचा आक्रमकपणा कमी झाल्याचे दिसून येत असून, अमेरिकेलाही युद्ध नकोच आहे, असे ट्रम्प म्हणाले. एकूण ट्रम्प यांनी आज नरमाईचा सूर लावला. दरम्यान, अमेरिका इराणला कदापि अण्वस्त्रे तयार करू देणार नाही. तसा प्रयत्न केल्यास इराणवर कडक आर्थिक निर्बंध लादले जातील, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला. 

इराण-अमेरिका तणाव भारतासाठी चिंताजनक

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढलेला तणाव आणि इराणकडून मंगळवारी अमेरिकेच्या सैन्यतळावर करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी आज देशाला उद्देशून भाषण केले. ट्रम्प म्हणाले की, इराणने केलेल्या हल्ल्यात एकाही अमेरिकी सैनिकाला इजा झालेली नाही. सर्व सैनिक सुरक्षित असून, अमेरिकेच्या सैन्यतळाची थोडी वित्त हानी झालेली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कुठल्याही आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी आमचे सैनिक सज्ज आहेत. आधीच्या आक्रमक भूमिकेपासून इराण मागे हटल्याचे दिसत असून, ही चांगलीच बाब आहे. अमेरिकेलाही शांतताच प्रिय आहे, असे ट्रम्प म्हणाले. "व्हाइट हाउस'मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष माईक पेन्सर, संरक्षणमंत्री मार्क इस्पर आणि परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांच्यासह सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

इराण म्हणतंय, 'आम्ही अमेरिकेचे 80 दहशतवादी ठार केले'

क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले होते की, स्वसंरक्षणासाठी आम्ही आवश्‍यक तेवढीच पावले उचलू. तणाव वाढविण्याचा इराणचा विचार नाही; तर दुसरीकडे ट्रम्प यांनी मात्र क्षेपणास्त्र हल्ल्यानंतरही सर्व काही ठिक असल्याचे ट्‌विट केले होते. अमेरिकेतील आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन नंतर ट्रम्प यांनी पुन्हा नरमाईचा सूर लावल्याचे सांगितले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: America President Donald Trump speaks about relations with Iran after attack