राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर ट्रम्प काय करणार?

trump
trump

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पराभव स्वीकारण्यास तयार नव्हते. नुकतंच त्यांनी सत्तेच्या हस्तांतरणासाठी आपण तयार असल्याचं म्हटलं आहे. यामुळे आता ज्यो बायडेन 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता ट्रम्प सत्तेतून पायउतार झाल्यानंतर काय करणार याची चर्चा रंगली आहे. 

अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर आधीच्या अनेक राष्ट्राध्यांनी राजकारणातून बाहेरची वाट निवडली. ट्रम्पसुद्धा असंच काही करणार का? ट्रम्प राजकारणी नाहीत त्यामुळे ते वेगळं  काय करणार याची उत्सुकता आहे. मात्र ते राजकारण सोडणयाची शक्यता कमी आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांच्याप्रमाणे ट्रम्प करू शकतात. ग्रोव्हर 1885 मध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर 1893 मध्ये दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले होते. अमेरिकेच्या संविधानानुसार कोणतीही व्यक्ती फक्त दोनवेळाच राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान होऊ शकतात. यंदा ट्रम्प यांना विरोध असतानाही त्यांनी मोठ्या प्रमाणावर मते मिळवली आहेत. त्यामुळे ते पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतात. 

सध्या डोनाल्ड ट्रम्प हे कायदेशीर लढायांमध्ये गुंतले आहेत. पुढच्या काळातही ते यावरच जोर देऊ शकतात. यामध्ये काही ठिकाणी त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे आरोप आहेत. त्यामुळे ट्रम्प पदावरून पायउतार होताच त्यांच्यावर असलेल्या आरोपांच्या फाइल्स पुन्हा उघडल्या जाण्याची शक्यता आहे. 

डोनाल्ड ट्रम्प हे उद्योगपती असून पुन्हा व्यवसायात लक्ष घालू शकतात. राष्ट्राध्यक्ष होण्याआधी ते सर्वात मोठी रिअल इस्टेट मोगलसह रिअॅलिटी टेलिव्हिजन स्टार होते. स्वत:चे ब्रँड अम्बॅसिडर होते. सध्या त्यांच्यावर जवळपास चार अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज आहे. हे कर्ज आपल्या एकूण संपत्तेच्या तुलनेत खूपच कमी असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यांची अनेक हॉटेल्स आणि गोल्फ कोर्स आहेत. कोरोनाचा फटका त्यांच्या ट्रॅव्हल इंडस्ट्रीला बसला आहे. 

डोनाल्ड ट्रम्प टेलिव्हिजन आणि मीडियासाठी नवीन नाहीत. ते मीडियामध्ये पाऊल टाकू शकतात. त्यामुळे ते न्यूज मीडियामध्ये दिसले तर नवल वाटायला नकोत. तसंच स्वत:चं चॅनेल सुरू करू शकतात किंवा एखाद्या न्यूज नेटवर्कसोबत काम करतील. 

डोनाल्ड ट्रम्प यांना आता राष्ट्राध्यक्ष म्हणून निवृत्ती वेतनसुद्धा मिळेल आणि इतर सुविधा मिळतील. 2017 मध्ये हे निवृत्ती वेतन 2 लाख डॉलर दरवर्षी होतं. याशिवाय आयुष्यभर सिक्रेट सर्विस सुरक्षा, आरोग्य आणि इतर सुविधा दिल्या जातील. ट्रम्प सध्या 74 वर्षांचे असून ते निवृत्तसुद्धा होऊ शकतात. मात्र काही लोकांचे असे म्हणणे आहे की, ट्रम्प यांचे सध्याचे वर्तन पाहता असा निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com