अमेरिकेची ‘दबंग’शाही

यूएनआय
Monday, 21 September 2020

संयुक्त राष्ट्रांनी इराणवर पूर्वी लागू केलेले निर्बंध अमेरिकेने आजपासून पुन्हा एकदा लागू केले आहेत. तसेच, हे निर्बंध ज्या देशांना मान्य नसतील त्यांच्यावरही निर्बंध घालण्याचा आमचा विचार आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी आज जाहीर केले. अमेरिकेच्या या एकतर्फी निर्णयाला युरोपीय देशांचा विरोध आहे.

वॉशिंग्टन - संयुक्त राष्ट्रांनी इराणवर पूर्वी लागू केलेले निर्बंध अमेरिकेने आजपासून पुन्हा एकदा लागू केले आहेत. तसेच, हे निर्बंध ज्या देशांना मान्य नसतील त्यांच्यावरही निर्बंध घालण्याचा आमचा विचार आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी आज जाहीर केले. अमेरिकेच्या या एकतर्फी निर्णयाला युरोपीय देशांचा विरोध आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इराणने त्यांच्या अणु कार्यक्रम बंद करण्याच्या बदल्यात त्यांच्यावरील आर्थिक निर्बंध उठविण्याबाबतचा शांतता करार २०१५ मध्ये झाला होता. अमेरिकेसह सहा जागतिक शक्तींचा या करारात समावेश होता. मात्र, यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद मिटला नाही आणि इराणकडून वारंवार कराराचा भंग होत असल्याची टीका करत अमेरिकेने २०१८ पासून करारातून अंग काढून घेतले. त्यांनी इराणवर आर्थिक निर्बंधही लागू करण्यास सुरुवात केली.

चष्मेबद्दूर रोखू शकतात कोरोनाच्या संसर्गाला

अमेरिका करार पाळत नसल्याने इराणनेही पुन्हा क्षेपणास्त्र चाचण्या सुरु करत अमेरिकेला वारंवार डिवचले. यामुळे चिडलेल्या अमेरिकेने इराणवर संयुक्त राष्ट्रांचे पूर्वीचे निर्बंध पुन्हा लागू करणार असल्याचे जाहीर केले होते, त्याची आज त्यांनी अंमलबजावणी केली. 

दुसऱ्या लाटेमुळे ब्रिटनमध्ये निर्बंध कडक; स्वयंविलगीकरण टाळल्यास साडेनऊ लाख रुपये दंड

ब्रिटन, फ्रान्ससारख्या करारातील इतर सहभागी देशांनी मात्र अमेरिकेला विरोध करत त्यांच्या या निर्बंधांकडे दुर्लक्ष करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे एकाकी पडलेल्या अमेरिकेने आज संयुक्त राष्ट्रांच्या सर्व देशांना इराणवरील निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन करतानाच असे न करणाऱ्याला परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला आहे. इराणविरोधात सर्वसमावेशक करार होत नाही, तोपर्यंत असाच दबाव कायम ठेवणार असल्याचा निश्‍चय ट्रम्प प्रशासनाने जाहीर केला आहे. 

आमचा ओरॅकलबरोबर करार पूर्ण : टिकटॉक

अमेरिकेला एकतर्फी अधिकार नाही
ब्रुसेल्स : संयुक्त राष्ट्रांनी इराणवरील हटविलेले निर्बंध अमेरिका एकतर्फी लागू करू शकत नाही, असा दावा युरोपीय समुदायाचे प्रतिनिधी जोसेफ बॉरेल यांनी आज केला. अमेरिकेने हे सर्व निर्बंध इराणवर लागू केल्याचे आज जाहीर केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. इराणने कराराचा भंग केला असल्याने त्यांच्यावर निर्बंध लागू केल्याचा अमेरिकेचा दावा आहे. मात्र, स्वत: अमेरिकेने २०१८ नंतर या करारातून अंग काढून घेतले होते. त्यामुळे त्यांना याबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकारच नाही, असे बॉरेल यांनी निदर्शनास आणून दिले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इराणला शस्त्र, तंत्रज्ञान पुरवठा करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्बंधांची दखल इतर सदस्य देशांनी घेतली नाही तर आम्ही त्या देशांविरोधात पावले उचलण्याची तयारी केली आहे. 
- माइक पॉम्पिओ, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america pressure on iran mike pompeo