बायडेन इन ॲक्शन! राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिलाच एअर स्ट्राइक; दहशतवादी तळ केले उद्ध्वस्त

टीम ई सकाळ
Friday, 26 February 2021

 राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर बायडेन यांनी पहिल्यांदाच एखाद्या देशाच्या दहशतवादी तळांवर हल्ल्याला मंजुरी दिली आहे. पेंटागनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सिरियात झालेल्या हवाई हल्ल्याला दुजोरा दिला.

दमिश्क - इराणसोबत अणु करारावर झालेल्या वादानंतर अमेरिकेनं इराणचा प्रभाव असलेल्या मिलिशियातील अनेक ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे. सिरियातील मिलिशियाच्या ठिकाणांवर हवाई हल्ला करण्यात आला. अमेरिकेच्या काही ठिकाणांवर कऱण्यात आलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. रॉयटर्स वृत्तसंस्थेला दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराकमध्ये अमेरिकेच्या ठिकाणावर इराकच्या कट्टरपंथींच्या गटाने हल्ला केला होता. यात अमेरिकेचा एक कॉन्ट्रॅक्टर ठार झाला होता. याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेनं सिरियामध्ये इराण  समर्थक मिलिशियाच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. 

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयातील दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं रॉयटर्सने म्हटलं की, सिरियातील मिलिशियाच्या तळांवर हवाई हल्ल्याला राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मंजुरी दिली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर बायडेन यांनी पहिल्यांदाच एखाद्या देशाच्या दहशतवादी तळांवर हल्ल्याला मंजुरी दिली आहे. पेंटागनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सिरियात झालेल्या हवाई हल्ल्याला दुजोरा दिला. त्यांनी म्हटलं की, राष्ट्राध्यक्षांच्या मंजुरीनंतरच ही कारवाई केली आहे. सिरियामध्ये केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये फक्त इराकने केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून नव्हे तर पुढच्या संभाव्य हल्ल्यांना रोखण्यासाठी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. अमेरिकेच्या सहकारी देशांशी चर्चेनंतरच हा निर्णय घेण्यात आला होता. 

हे वाचा - 'जगभरातील देशांनी पंतप्रधान मोदींना फॉलो करावं'; WHO प्रमुखांची स्तुतीसुमने

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं की, ज्या ठिकाणी एअर स्ट्राइक केला आहे त्याबद्दल आम्हाला पूर्ण माहिती होती. आम्हाला माहिती आहे की, टार्गेट कोणाला केलं आहे. तसंच जी ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत त्यांचा वापर शिया दहशतवाद्यांकडून अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या विरोधात केला जात होता. याठिकाणाहून 15 फेब्रुवारीला इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला केला होता. तसंच काही सैनिक जखमी झाले होते. 

हे वाचा - PUB G mobile 2 पुढच्या आठवड्यात होणार लॉन्च?; भारतात सुरु होण्याची शक्यता धूसर

अमेरिकेनं म्हटलं की, सिरियात शिया दहशतवाद्यांच्या तळांवर करण्यात आलेला हा हल्ला फक्त एक एअरस्ट्राइक नाही तर इशारा आहे. तसंच दहशतवाद्यांना शिक्षा देण्यात आली आहे. अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की, एअर स्ट्राइकमध्ये किती तळांवर हल्ला केला आणि यात किती दहशतवादी मारले गेले. मात्र अमेरिकेकडून दावा करण्यात आला आहे की, दहशतवाद्यांना धडा शिकवला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america us airstrike iraq syria biden approve first time as a president