
अमेरिकन फर्स्ट लेडी, कॅनडाचे पीएम अचानक युक्रेनमध्ये; काय असेल कारण?
रशियाकडून सतत होणाऱ्या हल्ल्यांदरम्यान अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन (Jill Biden) या कोणत्याही पूर्व माहितीशिवाय रविवारी युक्रेनमध्ये आल्या. जिल बायडन यांनी युक्रेनच्या फर्स्ट लेडी ओलेना झेलेन्स्की यांची स्लोव्हाकियाच्या सीमेजवळ असलेल्या गावातील शाळेत भेट घेतली, अशी माहिती असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेने दिली. सोबतच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनीही अचानक युक्रेनला कोणतीही सूचना न देता भेट दिली. (American First Lady, PM of Canada suddenly arrives in Ukraine)
विशेष म्हणजे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन आणि संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनीही दोन आठवड्यांपूर्वी युक्रेनला भेट दिली होती. अमेरिकेच्या आघाडीच्या नेत्यांच्या पाठोपाठ पहिल्या महिलेच्या युक्रेन भेटीकडे युक्रेन (ukraine) आणि युक्रेनच्या लोकांसोबत रशियन आक्रमणाविरुद्धच्या संघर्षात अमेरिकेच्या सहकार्याचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनाही युक्रेनमध्ये यायचे होते. परंतु, सुरक्षा यंत्रणांनी त्यांना युक्रेनमध्ये न येण्याचा सल्ला दिल्याचेही वृत्त आहे.
अमेरिकन एजन्सींनी जो बायडन यांना सांगितले की, जर ते युक्रेनमध्ये गेले तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. मात्र, जो बायडन युक्रेनला न जाता युक्रेनला लागून असलेल्या पोलंडला गेले. पोलंड नाटो देशांचा सदस्य आहे. युक्रेनमधील (ukraine) युद्धानंतर लाखो युक्रेनियन निर्वासितांनी पोलंड सीमेवर आश्रय घेतला आहे.
२३ सेकंदांचा व्हिडिओ जारी
जिल बायडन यांच्या प्रेस सेक्रेटरी मिशेल लारोस यांनी जिल बायडन (Jill Biden) आणि युक्रेनची फर्स्ट लेडी ओलेना झेलेन्स्की यांच्यातील भेटीचा २३ सेकंदांचा व्हिडिओ जारी केला आहे. मिशेल लारोस यांनी व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘जेव्हा फर्स्ट लेडी जिल बायडन आणि ओलेना झेलेन्स्की आज दुपारी युक्रेनमधील उझहोरोड येथे भेटले.’