TikTok अन् VChat बॅनसंदर्भातील सरकारी आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

सुशांत जाधव
Friday, 7 August 2020

चीनमधील कंपनीने विकसित केलेली किंवा त्यांच्या मालकीच्या अ‍ॅपमुळे राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्रीय धोरण आणि देशाची अर्थव्यवस्था यांना धोका आह, असा उल्लेख सरकारी आदेशामध्ये करण्यात आला आहे. 

 वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक (TikTok) आणि वीचॅट (VChat ) या लोकप्रिय चिनी अ‍ॅपवरील अमेरिकेतील निर्बंधासंदर्भातील आदेशावर स्वाक्षरी केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि देशातील अर्थव्यवस्थेला या अ‍ॅपमुळे धोका असल्याचा उल्लेख आदेशामध्ये करण्यात आलाय. 45 दिवसानंतर हे निर्बंध लागू होतील, असे ट्रम्प यांनी सरकारी आदेशातून स्पष्ट केले आहे. भारत टिकटॉक आणि वीचॅटवर निर्बंध घालणार पहिला देश आहे. भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत 106 चिनी अ‍ॅपवर निर्बंध घातले होते. भारताच्या पावलावर पाउल टाकत अमेरिकाही आता चीनला दणका देण्याच्या तयारीत आहे. ट्रम्प सरकारच्या या निर्णयाचे अमेरिकन खासदारांनी स्वागत केले आहे. 

ब्युटी विथ ब्रेन! मिस इंडियाची फायनलिस्ट बनली IAS

ट्रम्प यांनी जारी केलेल्या सरकारी आदेशानुसार,  चीनमधील कंपनीने विकसित केलेली किंवा त्यांच्या मालकीच्या अ‍ॅपमुळे राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्रीय धोरण आणि देशाची अर्थव्यवस्था यांना धोका आहे. टिकटॉक या मोबाईल अ‍ॅपसंदर्भात हा खास आदेश काढण्यात आला आहे, असा उल्लेखही यात करण्यात आलाय. कोरोनाच्या जगभरातील प्रादुर्भावानंतर चीन-अमेरिकेतील वाद चव्हाट्यावर आला होता. दोन्ही राष्ट्रांच्या आरोप-प्रत्यारोपाचा खेळ रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. अमेरिकेकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे, असा आरोप चीनने  4 ऑगस्ट रोजी केला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डोनाल्ड ट्रंप यांनी चिनी व्हिडिओ अ‍ॅप TikTok वर सातत्यपूर्ण दबाव वाढवणारी वक्तव्ये केली होती. जर चिनी कंपनीने मालकी हक्क अमेरिकन किंवा अन्य कंपनीला विकले तर बंदीची कारवाई होणार नाही, असेही ट्रम्प यांनी यापूर्वी म्हटले होते. अमेरिकेच्या या भूमिकेवर चीनने आक्षेप घेतला होता. जागतिकिकरण, पारदर्शकता या तत्वांचे अमेरिका उल्लंघन करत असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त वांग वेन्बिन यांनी म्हटले होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: american president Donald Trumps big action on tiktok ban on transaction with company bytedance