ब्युटी विथ ब्रेन! मिस इंडियाची फायनलिस्ट बनली IAS

aishwarya
aishwarya

नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाने मंगळवारी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला. यामध्ये मिस इंडिया फायनलिस्ट ऐश्वर्या शेरानने 93 वी रँक मिळवली आहे. या यशानंतर तिचं सर्वत्र कौतुक केलं आहे. मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावल्यानंतर अभ्यासाच्या जोरावर ती IAS बनली आहे. विज्ञान शाखेचं शिक्षण घेतलेल्या ऐश्वर्यानं अभ्यास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर हे यश मिळवलं आहे. युपीएससीमध्ये यश मिळाल्यानंतर माध्यमांशी बोलताना ऐश्वर्या म्हणाली की, माझ्या आईने माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या नावावरून माझं नाव ठेवलं होतं. 

ऐश्वर्याने सांगितलं की, आईला वाटत होतं की मी मॉडेलिंगमध्ये नाव कमवावं. तिला अजुनही वाटत की मिस इंडिया व्हावं. माझी निवड मिस इंडियाच्या 21 फायनलिस्टमध्ये झाली होती. मात्र मला पहिल्यापासूनच प्रशासकीय सेवेत काम करायचं होतं आणि माझी इच्छाही होती. प्रशासकीय सेवेत जायचं ठरवल्यानंतर मॉडेलिंगचे करिअर थांबवले आणि परीक्षेची तयारी सुरु केली. मॉडेलिंगच्या करिअरमधून बाहेर पडणं आणि आयएएस होणं सोपं नव्हतं. मात्र अशक्य असंही काही नव्हतं. शेवटी त्यात यश मिळालंच.

लहानपणापासून अभ्यासाची आवड होती आणि शाळेतही हुशार होते. युपीएससी क्लिअऱ करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे क्लास लावले नाहीत. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या. अभ्यासावेळी लक्ष विचलित होऊ नये यासाठी फोन स्विच ऑफ ठेवणं, सोशल मीडियापासून दूर राहणं या गोष्टी केल्याचं ऐश्वर्याने सांगितलं. 

विज्ञान शाखेचं शिक्षण घेतलेल्या ऐश्वर्याने उच्च शिक्षणासाठी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. तिचे वडील कर्नल अजय कुमार हे एनसीसी तेलंगणा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर आहेत. ऐश्वर्याने युपीएससीमध्ये यश मिळवल्यानंतर तिच्या या यशाबद्दल मिस इंडियाकडून तिचे अभिनंदन करण्यात आलं. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या निकालामध्ये हरियाणाच्या प्रदीप सिंगने अव्वल क्रमांक पटकावला असून दुसऱ्या क्रमांकार जतिन किशोर आणि तिसऱ्या क्रमांकावर प्रतिभा वर्मा यांनी स्थान पटकावले आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com