US Election : अंतिम डिबेटचा आखाडा सजला; कोरोनासह राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यांवर रंगणार चर्चा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

पहिली डिबेट ज्या पद्धतीने गरमागरम झाली होती ते पाहता ही येणारी डिबेट देखील अमेरिकेच्या महत्वाच्या  प्रश्नांवर तितकीच दर्जेदार होणार असल्याचे बोललं जातंय.

अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणुक जवळ येत आहे तसे निवडणुकीतील चुरस आणखीनच वाढत आहे. अमेरिकेत द्विपक्षीय लोकशाही असल्याने रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅटीक पक्ष यांच्यात ही निवडणूक होणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांनी तगडे आव्हान दिले आहे. दर चार वर्षांनी 1 नोव्हेंबर नंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी होणाऱ्या या निवडणुका फक्त अमेरिकेच्याच नव्हे तर जगाच्या राजकारणावर प्रभाव टाकतात. यावेळी या निवडणुका 3 नोव्हेंबर रोजी होणार आहेत.

प्रेसिडेंन्शियल डिबेट्सची परंपरा
अमेरिकेत निवडणूक होण्यापूर्वी  प्रेसिंडेन्शियल डिबेट होण्याची परंपरा आहे. तीन प्रेसिंडेन्शियल डिबेट्सद्वारे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार आमनेसामने येऊन अमेरिकेच्या प्रश्नांवर चर्चा, प्रश्नोत्तरे आणि वाद घालतात. यातून दोन्ही बाजू समोर येऊन कुणाची बाजू तगडी आहे याचा निर्णय मतदारांना घेता येतो. या वेळी पहिली प्रसिडेंन्शियल डिबेट 29 सप्टेंबर रोजी पार पडली. मात्र, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना झाल्यामुळे दुसऱ्या डिबेटबाबत शंका होती. 15 ऑक्टोबर रोजी होणारी ही नियोजित डिबेट ऑनलाईन  पद्धतीने घेण्यास ट्रम्प यांनी नकार दिल्यानंतर अखेर ही डिबेट रद्द झाली. 

हेही वाचा - USमधील बेरोजगारीचं खापर 'बायडेन'माथी, बायडेन जिंकले तर समजा चीन जिंकला

या निवडणुकीतील डिबेट्स
तिसरी नियोजित डिबेट ही 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पहिली डिबेट ज्या पद्धतीने गरमागरम झाली होती ते पाहता ही येणारी डिबेट देखील अमेरिकेच्या महत्वाच्या  प्रश्नांवर तितकीच दर्जेदार होणार असल्याचे बोललं जातंय. या डिबेटमध्ये कोविड-19 आणि राष्ट्रीय सुरक्षा  या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती कमिशन ऑफ प्रेसिडेंन्शियल डिबेट्स यांनी शुक्रवारी सांगितले. 
क्रिस्टेन वेकर हे या डिबेटसाठीचे मॉडरेटर असतील जे ही डिबेट व्यवस्थितपणे हाताळत पुढे नेतील. त्यांनी हे विषय निवडले असल्याचे डिबेट कमिशनने सांगितले. 

हेही वाचा - गैरप्रकार रोखण्यात अमेरिकेला सीबीआयची मदत

हे असतील प्रमुख विषय
- कोविड-19
- अमेरिकन कुंटुंब
- अमेरिकेतील वंशवाद
- पर्यावरणीय बदल
- राष्ट्रीय सुरक्षा आणि नेतृत्व

ही येऊ घातलेली डिबेट 22 ऑक्टोबर रोजी नॅशव्हीले बेलमाँट युनिव्हर्सिटीमध्ये होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: American Presidential election third debate will be on this subject on 22 october