गैरप्रकार रोखण्यात अमेरिकेला सीबीआयची मदत

पीटीआय
Saturday, 17 October 2020

अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांना फसविण्याच्या उद्देशाने कॉटर याने भारतातील पाच कंपन्यांशी संगनमत करून तांत्रिक सहकार्य देण्याचे भूलथाप देऊन शेकडो जणांना लुबाडल्याचे लक्षात आले आहे.

वॉशिंग्टन - भारताच्या केंद्रीय अन्वेषण विभाग आणि अमेरिकेच्या न्याय विभागाने एकत्रित प्रयत्न करताना अमेरिकेतील टेक्निकल सपोर्ट गैरव्यवहार उघडकीस आणला. या दोन्ही संस्थांनी एकमेकांशी समन्वय साधत एका मागून एक कारवाया करत ही मोहीम राबविली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या मायकेल ब्रायन कॉटर याच्यासह भारतातील पाच कंपन्यांना तांत्रिक सहकार्य करण्याचे त्यांचे कामकाज थांबविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांना फसविण्याच्या उद्देशाने कॉटर याने भारतातील पाच कंपन्यांशी संगनमत करून तांत्रिक सहकार्य देण्याचे भूलथाप देऊन शेकडो जणांना लुबाडल्याचे लक्षात आले आहे. या प्रकरणी अमेरिकेच्या ग्राहक संरक्षण विभागाकडे तक्रार नोंदविण्यात आली होती. या गैरप्रकाराचा सूत्रधार असलेल्या कॉटर याने विविध कॉल सेंटर कंपन्यांना हाताशी धरून अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांना फसविल्याचे लक्षात आले. या कंपन्या भारतात विविध ठिकाणांहून कामकाज करत असल्याचे दिसून आल्यावर अमेरिकेच्या न्याय विभागाने सीबीआयशी संपर्क साधून कारवाई केली. सीबीआयने दिल्ली, नोएडा, गुरगाव आणि जयपूर येथे असलेल्या या सर्व कंपन्यांवर छापे घालत तपास केला आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. यानंतर कॉटर आणि या कंपन्यांविरोधात फसवणूक करणे, त्या हेतूने संकेतस्थळ चालविणे, बनावट कंपनी स्थापन करणे आणि गैरव्यवहारातील पैसा इतरत्र वळविण्यासाठी बँकांचा वापर करणे, असे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. न्यायालयाने या सर्वांना कामकाज थांबविण्याचे आदेश देतानाच त्यांचे सर्व संपर्क जाळे नष्ट करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अशी होत होती फसवणूक 
कॉटर याची टीम अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांच्या संगणकावर अथवा मोबाईलवर बनावट सुरक्षा संदेश पाठवत असे. हे संदेश मायक्रोसॉफ्ट किंवा इतर बड्या कंपनीकडून आल्याचे भासविले जात असे. ‘तुमच्या संगणकात व्हायरस शिरला आहे’ असे सांगत ग्राहकाचा संगणक स्कॅन करण्याचा पर्याय दिला जात असे. तसेच, संगणक स्कॅन केल्यावर व्हायरस सापडल्याचे खोटेच दाखवून तो काढून टाकण्यासाठी एका विशिष्ट टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले जात असे. संबंधित नागरिकाने हा क्रमांक लावल्यास तो भारतातील या गैरप्रकारात सहभागी असलेल्या कॉल सेंटरशी जोडला जात असे. कॉल सेंटरवरील व्यक्ती अमेरिकेतील नागरिकाच्या संगणकाचा रिमोट ॲक्सेस मिळवून व्हायरस काढून टाकल्याचे भासवत असे आणि त्यांना शेकडो डॉलर फी म्हणून जमा करायला लावत असे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CBI to help the United States in preventing irregularities