USमधील बेरोजगारीचं खापर 'बायडेन'माथी, बायडेन जिंकले तर समजा चीन जिंकला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

अमेरिकेच्या अशा सगळ्या भागात मी आघाडीवर आहे जिथे हुशार लोक आहेत, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. Trump calls Biden 'worst candidate' in history of presidential politics

वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ही अमेरिकेच्या राजकारणातील महत्वाची निवडणूक मानली जाते. निव्वळ अमेरिकेवर नव्हे तर जगाच्या राजकारणावर दुरगामी परिणाम साधणारी ही निवडणूक असते. पुढील महिन्यात अमेरिकेत होऊ घातलेल्या या निवडणूकीला आता चांगलाच रंग चढला आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिक पक्षासमोर डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांनी शड्डू ठोकला आहे. या निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसा प्रचाराला चांगलाच वेग आला आहे.
या पार्श्वभूमीवर उत्तर कॅरोलिनामधील ग्रीनविलेमध्ये आपल्या प्रचारसभेत उपस्थित समर्थकांना संबोधिक करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले प्रतिस्पर्धी जो बायडेन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. स्थानिक वेळेनुसार गुरुवारी डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांच्यावर पुन्हा एकदा शेलक्या भाषेत टीका केली आहे. जो बायडेन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या राजकारणातील 'सर्वांत वाईट उमेदवार' असल्याची टीका त्यांनी केली आहे. 

ही टीका करताना त्यांनी आत्मप्रौढीने म्हटंलय की, राष्ट्राध्यक्षपदाची ही निवडणूक म्हणजे वेड्यासर शर्यत आहे. या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत मी अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वांत वाईट स्पर्धकासोबत शर्यत करत आहे. जर मी हारलो तर माझ्यासाठी तो दबाव असेल. मी इच्छा व्यक्त करतो की बायडेन या शर्यतीत चांगली कामगिरी करतील, जेणेकरुन मला कमी दबाव येईल. अशा वाईट स्पर्धकाबरोबर आपण कसं बरं हारू शकतो, नाही का? आपल्या एका प्रचार रॅलीत बोलताना ट्रम्प यांनी ही उपरोधिक टीका केली आहे. पुढे त्यांनी अशी पुष्टीही जोडली आहे की ते अमेरिकेच्या अशा सगळ्या भागात आघाडीवर आहेत जिथे हुशार लोक आहेत. 

हेही वाचा - ट्रम्प यांना धक्का; भारतीय-अमेरिकन लोकांचे बायडेन यांनाच समर्थन

ही निवडणूक म्हणजे एक साधीसोपी निवड आहे. जर बायडेन जिंकले तर समजा की चीन जिंकला आणि जर मी जिंकलो तर नॉर्थ कॅरोलिना आणि अमेरिका जिंकते. बायडेन हे एक भ्रष्ट राजकारणी आहेत आणि ते खपू वर्षापासून हा भ्रष्टाचार करत आहेत हे वॉशिंग्टनमधल्या सगळ्यांना माहितीय. असंही ट्रम्प म्हणाले. 

ट्रम्प यांनी बायडेन यांच्या मुलावर देखील टीका केली आहे. ते म्हणाले की, बायडेन यांचा मुलगा हंटर याने चीनच्या बिझनेस मॅगनेटसोबत एक डील केली आहे. ही डील 10 दशलक्ष डॉलर प्रती वर्षासाठी आहे आणि ही डील तेंव्हा केली गेलीय जेंव्हा चीन तुमचा रोजगार हिसकावून घेत होता. त्यामुळे, जर बायडेन जिंकले तर अमेरिकेवर चीनचा ताबा येईल असं समजा.

हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, "मला सुपरमॅन झाल्यासारखं वाटतय"

या रॅलीदरम्यान उपस्थित ट्रम्प समर्थकांनी 'फोर मोअर ईअर्स' अशा घोषणा दिल्या तसेच 'वुई लव्ह यू' असं म्हणून ट्रम्प यांना असलेले आपले समर्थनही जाहीर केले. ही निवडणूक राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण निवडणूक आहे. जेंव्हा अमेरिकेची लूट होत होती तेंव्हा बायडेन श्रीमंत होत होते, अशीही टीका त्यांनी केली. अमेरिकेच्या या महत्वपूर्ण निवडणूका तीन नोव्हेंबर रोजी पार पडणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trump calls Biden 'worst candidate' in history of presidential politics