मालीमध्ये सैन्याचा सशस्त्र उठाव; बंडखोरांनी अध्यक्षांसह पंतप्रधानांना घेतले ताब्यात

Armed-uprising-in-Mali-prim.jpg
Armed-uprising-in-Mali-prim.jpg

बामको- मालीत नाट्यमय घडामोडीनंतर देशाचे अध्यक्ष इब्राहिम बाऊबकर केईटा यांनी मंगळवारी (ता. १८) रात्री उशिरा राजीनामा दिला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्याविरुध्द आंदोलन सुरू होते. सशस्त्र जवानांनी घराला वेढा घातल्यानंतर काही तासांतच केईटांनी अध्यक्षपद सोडले. त्यानंतर, सरकारविरोधी आंदोलकांनी एकच जल्लोष केला. 

बंडखोर सैनिकांनी काटीमध्ये शस्त्रास्त्रे ताब्यात घेऊन राजधानी बामकोकडे वाटचाल सुरू केली. सैनिकांनी अध्यक्षांसह पंतप्रधान बाऊबो सिस्से यांनाही ताब्यात घेतले. ओआरटीएम या राष्ट्रीय वाहिनीवरून मास्क घातलेल्या केईटांनी राजीनाम्याची घोषणा केली. कालावधीच्या तीन वर्षे आधीच आपण राजीनामा देत असून आपला कार्यकाळ तातडीने समाप्त होत असल्याची घोषणाही त्यांनी केली. आपले सरकार आणि राष्ट्रीय संसदेचेही विसर्जन करत असल्याचे त्यांनी जनतेला सांगितले. गेली आठ वर्षे सुरू असलेले सरकारविरोधी आंदोलन आणि वाढत्या कोरोना साथीनंतर अखेर केईटा यांनी राजीनामा दिला. 

केईटा २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष झाले होते. त्यानंतर, पाच वर्षांनी त्यांची फेरनिवड झाली होती. लोकशाहीच्या आदर्शाबद्दल कौतुक झालेल्या मालीमध्ये सरकारवर बंड नीट हाताळल्याबद्दल सातत्याने टीका होत होती. अल कैदा व तिच्या संलग्न दहशतवादी संघटनाकडून देशाच्या लष्कराला पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, मालीतील घडामोडींचा संयुक्त राष्ट्रसंघासह आंतरराष्ट्रीय समुदायाने तीव्र निषेध केला. त्यानंतर, मालीच्या लष्कराने नव्याने निवडणुका घेण्याचे जाहीर केले. 

मालीमध्ये काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु होते. हजारो लोक रस्त्यावर उतरुन राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी केली होती. शिक्षण आणि डॉक्टरांनी पगारवाढीसाठी आंदोलन सुरु केले होते. त्यानंतर सरकारमधीय भ्रष्टाचार आणि नेपोटीझम विरोधात लोकांनी आंदोलन छेडले. आंदोलनाचे नेतृत्व मेहमोद डीको करत होते. सत्तेत राहण्यासाठी रक्ताचा एक थेंबही सांडण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे मी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया  इब्राहिम बाऊबकर केईटा यांनी दिली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com