अर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधी

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 18 October 2020

वादग्रस्त भूमीवरून एकमेकांच्या विरोधात युद्ध सुरु केलेल्या अर्मेनिया आणि अझरबैजान या देशांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा करार केला आहे.

बाकू (अझरबैजान) : वादग्रस्त भूमीवरून एकमेकांच्या विरोधात युद्ध सुरु केलेल्या अर्मेनिया आणि अझरबैजान या देशांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा करार केला आहे. गेल्या आठवड्यात रशियाच्या मध्यस्थीनंतर त्यांनी केलेला शस्त्रसंधी काही तासांतच भंग झाला होता. यावेळीही रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांनी या दोन्ही देशांशी चर्चा केल्यानंतर या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली. भौगोलिकदृष्ट्या अझरबैजानमध्ये असलेल्या, मात्र सांस्कृतिकदृष्ट्या अर्मेनियाला जवळ असलेल्या नागोर्नो-करबाख भागावरून या दोन देशांमध्ये गेल्या २५ वर्षांपासून वाद आहेत.

कोठे आहेत हे देश?

अर्मेनिया आणि अझरबैजान शेजारी-शेजारी राष्ट्रे असून ते आशिया खंडात येतात. दोन्ही देश एकेकाळी सोवियत संघाचे भाग होते. हे दोन्ही देश यूरोपच्या अगदी जवळ आहेत. भारतापासून हे देश 4 हजार किलोमीटर अंतरावर आहेत. अर्मेनिया आणि अझरबैजान इराण आणि तुर्की या देशांच्या मध्ये येतात. 

US Election: कमला हॅरिस यांच्या नावाचा चुकीचा उच्चार भोवला

दोन्ही देशांमध्ये का आहे तणाव? 

दोन्ही देश सोवियत संघाचे भाग होते, पण 80 व्या दशकात जेव्हा सोवियत संघाचे पतन झाले, तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये वाद सुरु झाला. नागोर्नो-काराबाख या भागावरुन उभय देशांमध्ये वाद आहे. हा भाग आर्मेनिया आणि अझरबैजानच्या सीमेवर आहे. 1991 साली दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. तीन वर्षांच्या संघर्षानंतर रशियाने हस्तक्षेप केल्याने 1994 साली सीजफायर करण्यात आले. 

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हा भाग अजरबैजानचा आहे, पण यावर आर्मेनियातील टोळ्यांचा ताबा आहे. त्यामुळे आर्मेनियन सैन्याने हा भाग आपल्या ताब्यात ठेवला आहे. चार हजार किलोमीटरचा हा भाग डोंगराळ आहे. या भागात नेहमीच तणावाची स्थिती राहिली आहे. 

2018 मध्येच हा तणाव निर्माण झाला होता, जेव्हा दोन्ही देशांनी आपल्या सीमा भागात सैनिकांची संख्या वाढवली होती. आता हा तणाव युद्धाच्या स्थितीपर्यंत गेला आहे. यूरोपातील अनेक देशांनी आर्मेनिया आणि अझरबैजानला शांततेचे आवाहन केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: armeniya and azerbaijan once again declare ceasfire