US Election : थेट अंतराळातून दिलं मत; जाणून घ्या कशी होते ही प्रक्रिया 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

गेल्या 23 वर्षांपासून अमेरिकेमध्ये लोकांना अंतराळातून मत देण्याची सुविधा प्राप्त आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेची हाय व्होल्टेज निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे. अद्याप या निवडणुकीचा औपचारिक निकाल घोषित झालेला नसला तरीही या निवडणुकीचे चित्र आता पुरेसं स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांनी जवळपास पराभूत केल्याचे निश्चित आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रक्रियेवर हरकत घेत न्यायालयात धाव घेतल्यामुळे मामला गरम झाला असून औपचारिक निकालाला थोडा उशीर होणार आहे. या निवडणुकीत लोकांनी ऐन कोरोना काळात पुरेशी काळजी घेत आपला हक्क बजावला आहे. मात्र, इतकंच नव्हे तर पृथ्वीपासून हजारो किलोमीटर दूर उंच आकाशात असणाऱ्या अंतराळवीरांनीदेखील या निवडणुकीत मतदान केलं आहे. 

अंतराळातून केलं मतदान
केट रुबिन्स नावाची एक अंतराळवीर सध्या एका इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर आहे. नॅशनल एरोनॉटीक्स स्पेस एडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासासोबत बातचित केली असता केटने या एकूण अंतराळातून मतदान करण्याच्या प्रक्रियेबाबत सांगितलं आहे. 

हेही वाचा - जॉर्जिया-मिशीगनची कायदेशीर लढाईही ट्रम्प हारले; कल बायडेन यांच्याच बाजूने

केट या 42 वर्षांच्या आहेत. त्या म्हणाल्या की, ज्याप्रकारे एखादा व्यक्ती देशाच्या बाहेर असल्यावर मतदान करतो, त्याचप्रकारे ही देखील प्रक्रिया पार पाडली जाते. त्यांनी म्हटलं की ही प्रक्रिया सुरु तेंव्हा झाली जेंव्हा त्यांनी फेडरल पोस्टकार्ड एप्लिकेशन भरलं. हे ऍप्लिेकशन जवळपास त्याच ऍप्लिकेशनसारखं असतं ज्यामध्ये आर्मीचे लोक बाहेर देशांत असल्यावर मतदानासाठी ऍप्लिकेशन करतात. मात्र, केट या सध्या बाहेर देशांत वगैरे नाहीयेत तर त्याहीपेक्षा लांब आहेत अगदी पृथ्वीपासूनच लांब आहेत. 

कशी असते प्रक्रिया 
अंतराळवीर आपल्या ट्रेनिंगसाठी हाऊस्टनमध्येच येतात, त्यामुळे जास्तकरुन अंतराळवीर टेक्सासचे नागरिक म्हणूनच मतदान करतात. मात्र, जर एखाद्या ऍस्ट्रॉनॉट्सला अंतराळातून आपल्या स्वत:च्याच राज्यातून मतदान करायचे असेल तर त्यांच्यासाठीही खास तजवीज केली जाते.  एफपीसीए मंजूर झाल्यावर ऍस्ट्रॉनॉट्स मतदानासाठी तयार होतात. अंतराळवीराच्या होमटाऊनमध्ये असलेल्या काउंटी क्लार्क नासाच्या हाऊस्टनमधली जॉनसन स्पेस सेंटरमध्ये एक बॅलेट पाठवून देतात. यानंतर स्पेस स्टेशन ट्रेनिंग कंप्यूटरच्या मदतीने टेस्ट केली जाते की हे बॅलेट  भरले आहे की नाही. त्यानंतर त्याला परत काउंटी क्लार्ककडे पाठवलं जातं. 

हेही वाचा - 'पुतीन देऊ शकतात राजीनामा; गंभीर आजाराशी सुरू आहे झुंज'
 
ही टेस्ट पूर्ण झाल्यावर एका सुरक्षित इलेक्ट्रॉनिक बॅलेट ऑफिसद्वारे तयार केलं जातं. त्यानंतर अंतराळवीर मतदान करतात आणि मग इमेलद्वारे काउंटी क्लार्कद्वारे त्याला औपचारिकरित्या रेकॉर्ड केलं जातं. त्याचा फक्त एकच पासवर्ड असतो जेनेकरुन फक्त अधिकाऱ्यांनाच ते उघडता यावं. प्रत्येक अमेरिकेच्या नागरिकाप्रमाणेच अंतराळवीरांना देखील आपले मत संध्याकाळी सातच्या आतच पाठवणे गरजेचे असते. जर असं झालं नाही तर त्यांचं मत मोजणीत येत नाही.

गेल्या 23 वर्षांपासून ही सुविधा

गेल्या 23 वर्षांपासून अमेरिकेमध्ये लोकांना अंतराळातून मत देण्याची सुविधा प्राप्त आहे. नासाच्या डेव्हीड वुल्फ हे पहिले असे अंतराळवीर बनले होते ज्यांनी रशियाच्य मीर स्पेस स्टेशनवरुन आपले मत दिले होते. त्यांच्यानंतर अनेक अमेरिकेच्या अंतराळवीरांनी याप्रकारने मतदान केलं आहे. केट यांनी दोनवेळा अंतराळातून मतदान केलं आहे. याआधी त्यांनी 2016 मध्ये याप्रकारे अंतराळात असताना मतदान केलं होतं. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झालं होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: astronaut voted in US presidential elections know how this process takes place