जॉर्जिया-मिशीगनची कायदेशीर लढाईही ट्रम्प हारले; कल बायडेन यांच्याच बाजूने

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

या निकालाने तीळपापड झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेची 2020 ची ही निवडणूक अत्यंत चुरशीची निवडणूक झाली आहे. या निवडणुकीचा अंतिम आणि औपचारिक निकाल येणं अद्याप बाकी आहे. असं असलं तरीही डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांनी रिपब्लिक पक्षाच्या विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चारीमुंड्या चीत केलं आहे, असंच दिसत आहे. थोडक्यात, मीच जिंकणार आणि जिंकलोही आहे, असं ठासून सांगणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना या निकालाने जबरी झटका बसला आहे, यात शंका नाही. आणि म्हणूनच या निकालाने तीळपापड झालेल्या डोनाल्ड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्याची मागणी करत त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे.

हेही वाचा - 'US Election : 'कंट्रोल डोनाल्ड, कंट्रोल'; ग्रेटाने उडवली खिल्ली; ट्रम्प यांच्या स्टाईलनेच दिले सडेतोड उत्तर

याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. मात्र जॉर्जिया आणि मिशिगनमधील न्यायाधीशांनी डोनाल्ड ट्रम्प यांची ही याचिका फेटाळून लावली आहे. या दोन्हीही राज्यात या दोहोंमध्ये अत्यंत चुरशीची अशी निवडणूक पहायला मिळत होती. आणि आता पुन्हा एकदा नेवाडा मतदारसंघातील मतमोजणीत देखील घोटाळा झाला आहे, असा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा कोर्टाकडे धाव घेण्याचा इशारा दिला आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 214 तर जो बायडन यांच्याकडे 253 इलेक्टोरल व्होट्स आहेत. नेवाडामध्ये सहा इलेक्टोरल व्होट्स आहेत. त्यामुळे नेवाडातील हे इलेक्टोरल व्होट्स निर्णायक आणि महत्वपूर्ण ठरू शकतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्जियामध्ये 53 उशिरा आलेले बॅलेट्स हे ऑन टाइम बॅलेट्समध्ये मिसळले गेल्याचा आरोप केला होता. 

हेही वाचा - US Election - ट्रम्प म्हणतात निवडणुकीत चोरी तर बायडेन यांना जिंकण्याचा विश्वास; पण निकाल कधी?
ट्रम्प यांनी मिशिगनमध्ये मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायाधीशांनी ट्रम्प यांचे हे दोन्ही दावे फेटाळून लावत मतमोजणीमध्ये घोटाळा नसल्याचा निर्वाळा दिला आहे. ज्या बॅलेट्सवर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत त्या अनधिकृत असल्याचा कसलाही पुराव नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जेम्स बास यांनी दिला होता. याबरोबरच नेवाडाच्या क्लार्क काऊंटीमध्येही गडबड झाल्याचा आरोप ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी केला होता.

अमेरिकेतील ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक मानली जाते. तीन नोव्हेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान करण्यात आले. या निवडणुकीचा औपचारिक निकाल अजून काही दिवसांनी जाहीर होऊ शकतो. मात्र, अटीतटीच्या या निवडणुकीत ट्रम्प आणि बायडेन समर्थकांमध्ये चांगलीच जुंपलेली दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election 2020 georgia and michigans legals fight donald looses