'पुतीन देऊ शकतात राजीनामा; गंभीर आजाराशी सुरू आहे झुंज'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

अलिकडेच आलेल्या काही फोटोंमुळे पुतिन यांच्या आजाराबाबतच्या चर्चा आणखीनच धारदार झाल्या आहेत. 

मास्को : गेल्या जवळपास 20 वर्षांपासून रशियावर राज्य करणाऱ्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवृत्तीची घोषणा लवकरच होऊ शकते. पुढच्या वर्षाच्या सुरवातीलाच ते आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, पुतिन यांच्याकडून राजीनामा देण्याची विनंती त्यांची गर्लफ्रेंड जिमनास्ट अलीना कबाइवा आणि त्यांच्या दोन मुलींनी केला आहे. असं म्हटलं जात आहे की, पुतिन पार्किसंस नावाच्या एका आजाराशी लढत आहेत. अलिकडेच आलेल्या काही फोटोंमुळे पुतिन यांच्या आजाराबाबतच्या चर्चा आणखीनच धारदार झाल्या आहेत. 

रशियन राजकीय शास्त्रज्ञ वलेरी सोलोवे यांनी ब्रिटीश वृत्तपत्र द सनला सांगितले की रशियन राष्ट्रपतींची गर्लफ्रेंड आणि त्यांच्या दोन मुली पुतीन यांना राजीनामा देण्यासाठी मागे लागल्या आहेत. त्यांनी म्हटलं की, पुतिन यांचं एक कुटुंब आहे आणि त्यातील सदस्यांचा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर मोठा  प्रभाव आहे. पुतिन येत्या जानेवारीमध्ये दुसऱ्या कोणाच्यातरी हातात सत्ता सोपवू शकतात. त्यांनी म्हटलंय की, राष्ट्राध्यक्ष हे पार्किसंस या आजाराने पिडीत आहेत आणि अलिकडेच आलेल्या फोटोंमध्ये त्यांच्या या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. 

हेही वाचा - US Election : 'कंट्रोल डोनाल्ड, कंट्रोल'; ग्रेटाने उडवली खिल्ली; ट्रम्प यांच्या स्टाईलनेच दिले सडेतोड उत्तर

पुतिन अलिकडेच सतत पायाला भिंगरी लावून आहेत. द सन च्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रशियन राष्ट्राध्यक्ष हे वेदनेमुळे त्रस्त आहेत. रशियाचे खासदार एक विधेयक आणण्याच्या तयारीत असतानाचा पुतिन यांच्या या राजीनाम्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. या विधेयकानुसार त्यांना अपराधाच्या कारवाईपासून आजीवन सुट मिळू शकते. 

हेही वाचा - US Election - ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या; मतमोजणीत घोटाळ्याचा आरोप निवडणूक निरीक्षकांनी फेटाळला
या नव्या विधेयकांना स्वत: पुतिन यांनीच सादर केलं होतं. या विधेयकानुसार पुतिन जिवंत असेपर्यंत त्यांच्यावर कसलीही कायदेशीर कारवाई केली जाण्यापासून त्यांना सुटका मिळणार आहे. रशियाच्या सरकारी चॅनेल आरटीच्या म्हणण्यानुसार, हे विधेयक म्हणजेच रशियात सत्तेच्या हस्तांतरणाचा संकेत आहे. पुतिन पार्किसंस या आजाराशी झुंज देत आहेत अशा बातम्या याआधीही आलेल्या होत्या. हे काही पहिल्या वेळेलाच नाहीये. सोलोवेई यांनी म्हटलंय की लवकरच एक नवीन राष्ट्राध्यक्ष बनवला जाईल आणि त्याला पुतिन यांच्या हाताखाली ट्रेनिंग दिली जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vladimir putin might resign from post as he is suffering from parkinson