मुलांसोबत नृत्य केल्याने पाच मुलींची निर्घृण हत्या!

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या दुर्गम भागातील कोहिस्तान या गावातील पाच मुलींनी मुलांसोबत नृत्य केल्याने त्यांची अंगावर गरम पाणी आणि गरम कोळसे टाकून क्रूर पद्धतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या दुर्गम भागातील कोहिस्तान या गावातील पाच मुलींनी मुलांसोबत नृत्य केल्याने त्यांची अंगावर गरम पाणी आणि गरम कोळसे टाकून क्रूर पद्धतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अलिकडेच समोर आलेली ही घटना सहा वर्षांपूर्वीची आहे. कोहिस्तानमधील बाजीगा, सारीन जान, बेगम जान, अमिना आणि शाहीन या पाच मुली नारंगी रंगाचा स्कार्फ घालून मुलांसोबत नाच करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये पाचही मुली मुलासोबत नृत्य करताना, हसताना, गाण्यावर टाळ्या वाजवताना दिसत होत्या. व्हिडिओ पाहिल्यानंतर गावातील कुळ पंचायतीने मुलांसोबत नृत्य करणे पाप असल्याचे म्हणत मुलींना ठार करण्याचे निर्देश कुटुंबियांना दिले. पंचायतीच्या आदेशाप्रमाणे कुटुंबियांनी मुलींच्या अंगावर गरम पाणी आणि गरम कोळसे टाकून त्यांची निर्घृण पद्धतीने हत्या केली. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या अफजल नावाच्या मुलाच्या भावाचीही हत्या केल्याचे तपासातून समोर आले आहे.

अफजल गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणातील दोषींना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक प्रयत्नांनंतर त्याने एका वकिलांच्या मदतीने या प्रकरणातील दोषींविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अशा प्रकारच्या कुळ पंचायतीच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठविणारा अफजल हा पहिलाच व्यक्ती ठरला आहे. त्यामुळे ही बातमी सगळीकडे पसरली. मात्र, तपास करताना गावातील लोक अजिबातच सहकार्य करत नसल्याचा त्याला अनुभव आला. ज्यावेळी तपास अधिकारी गावात पोहोचले त्यावेळी या मुली जिवंत असल्याचा दावा करत याच मुलींसारख्या दिसणाऱ्या मुली अधिकाऱ्यांसमोर उभ्या करण्यात आल्या. याबाबत माहिती देताना अफजल म्हणाला, 'त्या घटनेमुळे माझे कुटुंब उध्वस्त झाले आहे. त्या पाच मुलींना ठार करण्यात आले आहे. माझ्या भावांचीही हत्या करण्यात आली आहे. मलाही ठार करण्यात येईल, मात्र याविरुद्ध कोणीतरी बोलायला हवे.'

Web Title: Atrocious murder of five girls