येमेनमध्ये गृहयुद्धाचा भडका; पंतप्रधान, मंत्री उतरलेल्या विमानतळावरच स्फोट; 13 जणांचा मृत्यू

टीम ई सकाळ
Wednesday, 30 December 2020

स्फोट होण्याच्या काही वेळ आधीच सरकारच्या नव्या कॅबिनेट मंत्र्यांचे विमान याठिकाणी पोहोचलं होतं. हे सर्व मंत्री सौदी अरेबियाहून इथं परतले होते.

अदन  - अरबी देश येमेनमधील अदन विमानतळावर बुधवारी बॉम्बस्फोटांचा धमाका झाला. रॉयटर्सन वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार या स्फोटामध्ये कमीत कमी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच 12 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्फोट होण्याच्या काही वेळ आधीच सरकारच्या नव्या कॅबिनेट मंत्र्यांचे विमान याठिकाणी पोहोचलं होतं. हे सर्व मंत्री सौदी अरेबियाहून इथं परतले होते. येमेनमध्ये बराच काळ झालं गृहयुद्ध सुरू आहे. 

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, घटनास्थळी असलेल्यांनी सांगितले की, विमान उतरल्यानंतर काही वेळातच विमानतळावर गोळीबाराचा आवाज ऐकू आला. पंतप्रधान मईन अब्दुलमलिक आणि राजदूत सईद अल जबर यांच्यासह कॅबिनेट सदस्यांना सुरक्षित जागी नेण्यात आलं. पंतप्रधान मईन यांनी ट्विट करून आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं. 

हे वाचा - अमेरिकेतील लसीकरणाबाबत बायडेन यांनी व्यक्त केली चिंता; ट्रम्प यांच्यावर टीका

मईन यांनी म्हटलं की, मी आणि सरकारचे सदस्य अदनच्या हंगामी राजधानीत आहे. आम्ही सर्वजण ठीक आहे. त्यांनी सांगितलं की, अदन एअरपोर्टला टार्गेट करून करण्यात आलेला हा भ्याड हल्ला त्या युद्धाचा भाग आहे जो येमेन राज्य आणि तिथल्या लोकांविरोधात सुरू आहे. 

पंतप्रधान मईन यांच्या नव्या मंत्रीमंडळाची निर्मिती ही राष्ट्रपती अब्द रब्बो मन्सूर हादी यांच्याशी प्रामाणिक असलेले दल आणि फुटीरतावाद्यांचे एसटीसी यांच्यातील मतभेद संपवण्याच्या दृष्टीने केली होती. सरकारने या कॅबिनेटच्या माध्यमातून दोन्ही पक्षातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला होता. 2015 मध्ये वाढलेल्या या वादानंतर येमेनमधील परिस्थिती बिघडली होती. याकाळात सौदीचं नेतृत्व असलेल्या अरबी राज्यांनी राष्ट्रपती हादी यांची सत्ता सोपवण्यासाठी सैन्याची कारवाई केली होती. 

हे वाचा - निवडणुकीची लढाई जिंकला पण आयुष्याची हरला; नवनिर्वाचित खासदाराचा कोरोनामुळे मृत्यू

सरकारचे सर्व सदस्य फुटीरतावाद्यांसोबत करार करून अदनला परतले होते. नव्या मंत्रिमंडळाने राष्ट्रपती हादी यांच्या सरकारला दक्षिण फुटीरतावाद्यांसोबत एकत्र केलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attack on Aden airport when new cabinet arrives 13 death