ऑस्ट्रेलियाने बदलला राष्ट्रगीतातला एक शब्द; असं करण्यामागे नेमकं कारण काय?

टीम ई सकाळ
Friday, 1 January 2021

ऑस्ट्रेलिया सरकारने आपल्या राष्ट्रगीतातील एका शब्दात बदल केला आहे. या बदलास पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी ‘एकतेची भावना’ असे नाव दिले आहे. 

कॅनबेरा - देशातील मूळ नागरिकांच्या सन्मानार्थ ऑस्ट्रेलिया सरकारने आपल्या राष्ट्रगीतातील एका शब्दात बदल केला आहे. या बदलास पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी ‘एकतेची भावना’ असे नाव दिले आहे. पंतप्रधान मॉरिसन यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रगीत ‘ॲडव्हान्स ऑस्ट्रेलिया फेअर’ ची दुसरी ओळ फॉर वुई आर यंग ॲड फ्री (आम्ही तरुण आणि स्वतंत्र आहोत) यात बदल केला आहे. ऑस्ट्रेलियाने 1984 नंतर पहिल्यांदाच राष्ट्रगीतामध्ये बदल केला आहे. 

फॉर वुई आर वन ॲड फ्री (आम्ही एकसंघ आणि स्वतंत्र आहोत) असे करत असल्याची घोषणा केली. हा बदल आजपासून लागू करण्यात आला. मॉरिसन यांनी म्हटले की, ऑस्ट्रेलिया हा पृथ्वीवरचा सर्वात यशस्वी बहुसांस्कृतिक देश आहे. देशातील महान एकता राष्ट्रगीतातून संपूर्णपणे प्रतिबिंबित करण्यासाठी हाच सर्वोत्तम काळ आहे. ही एकतेची भावना असून हेच सत्य आमचे राष्ट्रगीत जगासमोर मांडते, असे मॉरिसन यांनी नमूद केले.

पंतप्रधान म्हणाले की, एकता आपल्या राष्ट्रगीतामधून दिसायला हवी हे ठरवण्याची ही वेळ आहे. ऑस्ट्रेलिया पृथ्वीवरील बहुसांस्कृतिक असा देश होता. एक आधुनिक देश म्हणून तरुण नक्कीच आहे पण आमच्या देशाची गोष्ट ही प्राचीन आहे. आम्ही एकतेच्या भावनेवर विश्वास ठेवतो असंही ते म्हणाले. 

हे वाचा - परदेशी कर्मचाऱ्यांना ट्रम्प यांचा झटका; वर्किंग व्हिसा संदर्भात कटू निर्णय

इंडिजिनियस ऑस्ट्रेलियन केन वॅट याने सांगितलं की, या बदलासाठी सूचना मागवल्या होत्या आणि यासाठी सहमतीही होती. एका शब्दाचा बदल हा लहान वाटेल पण उद्देश महत्त्वाचा होता. न्यू साउथ वेल्स राज्याचे प्रमुख ग्लेडिस बेरेकिक्लियान यांनी ऑस्ट्रेलियन लोकांसाठी समर्थन दिल्यानतंर दोन महिन्यांपेक्षा कमी काळात हा बदल करण्यात आला. त्यांनी म्हटलं होतं की, राष्ट्रगीतात त्यांना आणि त्यांचा इतिहास दिसून येत नाही. 

गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाची रग्बी टीम अर्जेंटिनाविरुद्ध सामन्याआधी स्वदेशी भाषेत राष्ट्रगीत गाणारी पहिली स्पोर्ट्स टीम बनली होती. राष्ट्रगीत अॅडव्हान्स ऑस्ट्रेलिया फेअर हे पीटर डोड्स मॅककॉर्मिकने रचलं होतं. 1878 मध्ये पहिल्यांदा गायलेलं हे गीत 1984 मध्ये ऑस्ट्रेलियाने राष्ट्रगीत म्हणून घोषित केलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: australia-prime minister anounce changed-one-word-in-its-national-anthem