
अमेरिकेत नोकरीसाठी दरवर्षी मोठया प्रमाणावर परदेशी नागरिक येतात.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या वर्षाच्या सुरवातीलाच परदेशी कर्मचाऱ्यांना झटका दिला आहे. त्यांनी गुरुवारी स्लथांतरबंदीचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आधीपासून लावलेल्या व्हिसावरील प्रतिबंधांना तीन महिन्यांपर्यंत वाढवलं आहे. आता हे प्रतिबंध 31 मार्च 2021 पर्यंत लागू राहतील. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गुरुवारी या आदेशावर हस्ताक्षर केले आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे कार्य व्हिसा जारी करण्याच्या कामाला तीन महिन्यांसाठी रद्द केलं आहे. करोना संकटात अमेरिकन नागरिकांचे उर्वरित रोजगार वाचवण्यासाठी स्थलांतरबंदी लागू करण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता.
हेही वाचा - चीनमध्ये आढळला नव्या स्ट्रेनने बाधित पहिला रुग्ण
अमेरिकेत नोकरीसाठी दरवर्षी मोठया प्रमाणावर परदेशी नागरिक येतात. त्यांना एच 1 बी आणि अन्य वर्क व्हिसा दिले जातात. तेच व्हिसा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता. आता याचा कार्यकाळ अजून तीन महिने वाढवण्यात आला आहे. एप्रिल आणि जून महिन्यात स्थलांतरबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. ही स्थलांतर बंदी या 31 डिसेंबरला समाप्त होणार होती. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी आता ही बंदी 31 मार्चपर्यंत वाढवली आहे. ट्रम्प सरकारच्या या परदेशी कर्मचाऱ्यांच्या प्रवासावर बंदीच्या निर्णयाचा अनेक उद्योजकांनी जाहीरपणे विरोध केला होता.
अमेरिकेचे नवे राष्ट्रध्यक्ष होणाऱ्या जो बायडन यांनी देखील त्यांच्या या निर्णयाला विरोध दर्शवला होता. पण आता या पदावर औपचारिक रित्या निवडून आल्यावर त्यांनी काहीही भाष्य केलं नाहीये. कोरोनाचा फटका बसल्यामुळे सध्या अमेरिकेत दोन कोटी लोकांना बेरोजगार भत्ता मिळत आहे.