'कुठेच न जाणाऱ्या' विमानाचं तिकिट 2 लाख रुपयांपर्यंत; तरीही 10 मिनिटांत बुकिंग फुल्ल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

इतके दर असूनही कुठेच न जाणाऱ्या या विमानाचे बूकिंग फुल्ल झाले आहे. कंपनीने असंही सांगितलं की, कंपनीच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात कमी वेळात विक्रमी तिकिट विक्री झाली. 

सिडनी - सध्या कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळपास ठप्पच आहे. हळू हळू ही वाहतूक टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणेही सध्या सुरु करण्यात आलेली नाही. आता काही देशांनी देशांतर्गंत विमानसेवा सुरु केली आहे. ऑस्ट्रेलियातही विमानसेवा सुरु कऱण्यात आली आहे. मात्र यात विमान कुठेही जाणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या क्वांटास एअरलाइन्सने अनोख्या फ्लाइट टू नोव्हेअरची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे कुठंच न जाणाऱ्या या विमानाच्या तिकिटांची फक्त 10 मिनिटांतच विक्री झाली. 

फ्लाइट टू नो व्हेअर ही ऑस्ट्रेलियन एअरलाइन्स क्वांटासने सुरु केलेली विशेष विमानाची एक फेरी आहे. ऑस्ट्रेलियात आता विमान प्रवासावरील निर्बंध कमी केले आहेत. त्यामुळे देशांतर्गत विमान प्रवास करता येतो. यातच क्वांटासने फ्लाइट टू नो व्हेअर अशी एक विमानाची फेरी सुरु केली. यामध्ये विमान उड्डाण करून पुन्हा त्याच ठिकाणी परत उतरणार आहे. द इनडिपेंडंटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

हे वाचा - ट्रम्प प्रशासनाच्या एका निर्णयाने येमेनमध्ये तडफडून मरतायत लहान मुलं

कुठेही न जाणारं विमान सात तासांचे उड्डाण करून पुन्हा आहे त्या ठिकाणी उतरणर आहे. या प्रवासात विमान देशातील सुंदर अशी ठिकाणे अवकाशातून दाखवणार आहे. राजधानी सिडनीतील विमानतळावरून ही विमानसेवा सुरु करण्यात येईल. यातील पहिले विमान 10 ऑक्टोंबरला उड्डाण करणार आहे. यात एकूण 134 सीट असतील. तिकिटाचे दर 575 ते 2765 डॉलर म्हणजेच 40 हजार ते जवळपास दोन लाख रुपयांपर्यंत आहेत. इतके दर असूनही कुठेच न जाणाऱ्या या विमानाचे बूकिंग फुल्ल झाले आहे. कंपनीने असंही सांगितलं की, कंपनीच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात कमी वेळात विक्रमी तिकिट विक्री झाली. 

हे वाचा - भारताच्या आघाडीमुळे खवळला चीन, तिबेटमध्ये युद्धसराव करत डागली मिसाईल

क्वांटासने म्हटलं की, कोरोनामुळे बंद असलेली विमानसेवा सुरु झाल्यानंतर या उड्डाणासाठी लोकांचा प्रतिसाद थक्क करणारा आहे. असाच प्रतिसाद मिळाला तर अशा प्रकारच्या उड्डाणांबाबत विचार केला जाईल. सध्या आंतरराष्ट्रीय निर्बंध असून ते कधी शिथिल होतील याकडे लक्ष असल्याचं कंपनीने सांगितलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: australia quantas flight to nowhere booking full