दोन देशांमध्ये युद्धाचा भडका; 23 जणांचा मृत्यू तर 100 हून अधिक जखमी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

संघर्षात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच यात 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती नागरनो-करबाख सेनेचे उपप्रमुख अरतुर सरकिसियान यांनी दिली.

येरेवान - अर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशांमध्ये रविवारी युद्ध सुरु झालं आहे. नागोरनो-करभाख भागासाठी हा संघर्ष होत आहे. संघर्षात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच यात 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती नागरनो-करबाख सेनेचे उपप्रमुख अरतुर सरकिसियान यांनी दिली. मात्र अद्याप मृत्यू झालेल्यांपैकी सैनिक किती आणि नागरीक किती याची माहिती समजू शकलेली नाही. 

याआधी आर्मोनियातील मानवाधिकार लोकपालांनी सांगितलं होतं की, हल्ल्यामध्ये एक महिला आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. तर अझरबैजानच्या राष्ट्रपतींनी म्हटलं की, सैन्याला नुकसान झालं आहे. आर्मेनियाने अझरबैजानची दोन हेलिकॉप्टर पाडली असून तीन टँक तोफेनं उडवली असल्याचा दावाही केला आहे. मात्र अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयानं हे दावे फेटाळून लावले आहेत. 

अझरबैजानच्या सीमेत असलेल्या आर्मेनियाई जातीच्या लोकांच्या हद्दीत रविवारी सकाळी ही लढाई सुरु झाली. 1994 मध्ये फुटीरतावाद्यांचं युद्ध संपल्यानंतर हा भाग आर्मेनियाचे समर्थन करणाऱ्या आर्मेनियाई लोकांच्या ताब्यात आहे. असं असलं तरी ही लढाई कशामुळे सुरु झाली हे समजू शकले नाही. जुलै महिन्यात दोन्ही देशांमध्ये संघर्ष पेटल्यानंतर ही मोठी लढाई आहे. जुलैमध्येसुद्धा 16 जणांचा मृत्यू झाला होता. 

तुर्कीचे राष्ट्रपतींचे प्रवक्ते इब्राहिम कलीन यांनी ट्वीट केलं की, आर्मेनियाने नागरी वस्तीत हल्ला करून उल्लंघन केलं आहे. धोकादायक असा हा संघर्ष लवकरात लवकर कमी करावा असंही त्यांनी म्हटलं. नागोरननो-करबाख भाग जवळपास 4 हजार 400 चौरस किमी इतका आहे. तसंच आर्मेनियाच्या सीमेपासून 50 किमी अंतरावर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Azeri Armenian clashes 23 people killed over 100 injured