अफगाणिस्तान : बेपत्ता झालेलं बाळ अखेर सापडलं; विमानतळावर टॅक्सी ड्रायव्हरने... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Afghanistan

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर मोठा गोंधळ माजला होता. तेव्हा विमानतळावर एका बाळाचा फोटो व्हायरल झाला होता.

अफगाणिस्तान : बेपत्ता झालेलं बाळ अखेर सापडलं; टॅक्सी ड्रायव्हरने...

काबुल - अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानने (Taliban) ताबा मिळवल्यानंतर मोठा गोंधळ झाला होता. अनेक नागरिक देश सोडून जिवाच्या आकांताने पळाले होते. त्यावेळची दृश्ये हृदय हेलावून टाकणारी होती. यातच एक फोटो व्हायरल झाला होता तो म्हणजे तारेच्या कुंपणावरून एका चिमुकल्याला लष्करातील जवान वर घेत असल्याचा. चिमुकल्याला वाचवल्यानं तेव्हा मोठी चर्चाही झाली. मात्र तेव्हापासून चिमुकला बेपत्ता होता. अखेर जवळपास सहा महिन्यांनी ते बाळ त्याच्या कुटुंबात सुखरुप पोहोचलं आहे.

काबुल विमानतळावर १९ ऑगस्टला बराच गोंधळ झाला होता. नागरिक सैरावैरा धावत होते आणि प्रत्येकजण देश सोडण्यासाठी धडपडत होता. त्यावेळी बाळासह कुटुंबिय विमानतळावर आले होते. त्यांनी आपल्या बाळाला काटेरी कुंपणावर असलेल्या जवानाकडे सुपुर्द केलं. नंतर जेव्हा ते बाळ शोधायला गेले तेव्हा ते कुठेच दिसेना. खूप शोधाशोध केली तर बाळाचा शोध लागला नव्हता.

विमानतळावरील गोंधळात बाळाला एका २९ वर्षांच्या टॅक्सी ड्रायव्हरने पाहिलं होतं. ते बाळ विमानतळावर दिसल्यानंतर ड्रायव्हरने घरी नेलं. मुलाला आपलं मानून त्याला वाढवण्याची त्याची इच्छा होती. शेवटी चर्चा आणि विनंतीनंतर, तालिबान पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ड्रायव्हरने शनिवारी मुलाला त्याच्या कुटुंबियांकडे सोपवलं.

हेही वाचा: 6 देशांनी टीका केल्याच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी

बाळाचं कुटुंबिय सध्या काबुलमध्ये राहतं. त्यांनी सांगितलं की,'आता त्याला त्याच्या आई वडिलांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करू.' बाळाचे आई वडिल ऑगस्टमध्येच अमेरिकेला गेले होते. तेव्हा विमानतळावर बाळाला जवानाकडे दिलं पण त्यानतंर बाळ कुठेच दिसलं नाही. त्यांनी अनेकांना विचारून पाहिलं मात्र कुणालाच याबाबत माहिती नव्हती. सैनिक बाळाला सुखरुप विमानतळावर आत पोहोचवतील अशी त्यांना आशा होती, पण झालं वेगळंच. आता बाळ निदान कुटुंबियांकडे परत पोहोचल्याचा तरी आनंद त्यांना आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AfghanistanKabul
loading image
go to top