भारताच्या शेजारी देशानं घातली गोहत्येवर बंदी; संसदेत विधेयकाला मंजुरी

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 29 September 2020

श्रीलंका सरकारने गुरांच्या कत्तलीवर बंदी घालणाऱ्या विधेयकास मान्यता दिली आहे.

कोलंबो- श्रीलंका सरकारने गुरांच्या कत्तलीवर बंदी घालणाऱ्या विधेयकास मान्यता दिली आहे. गोमांस खाणाऱ्यांसाठी त्याच्या आयातीचा व ते सवलतीच्या दराने उपलब्ध करण्याचा निर्णय मात्र घेण्यात आला. श्रीलंकन सरकारच्या या निर्णयामुळे आता म्हैस, गाय, बैल यांच्या कत्तलीवर बंदी असणार आहे. 

मंत्रीमंडळाचे प्रवक्ते केहेलिया राम्बुकवेला यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांचा प्रस्ताव सत्ताधारी श्रीलंका पोदुजाना पेरामुना या सत्ताधारी पक्षाच्या संसदीय समितीने महिन्याच्या प्रारंभीच मंजूर केला होता. आता हा कायदा लागू करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल.

ट्रम्प-बायडेन यांच्यात डिबेट'युद्ध'; कोणत्या मुद्यांवर होणार वाद? का...

दरम्यान, शेतीच्या कामांसाठी उपयोगात आणणे शक्य नसलेल्या थकलेल्या गुरांसाठी लवकरच एक कार्यक्रम जाहीर केला जाईल. कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या देशात ग्रामीण भागातील जनतेसाठी उपजीविकेची साधने विकसित करण्यात गुरांचा वाटा प्रचंड असल्याचे मंत्रीमंडळाने आवर्जून नमूद केले.

विविध राजकीय पक्षांनीही हा मुद्दा मांडला होता. गुरांच्या कत्तलीचे प्रमाण वाढणे, पशुधनाचे स्रोत कमी होणे अशा कारणांमुळे पारंपरिक शेतीसाठी गुरांची कमतरता निर्माण झाली. याशिवाय स्थानिक दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीमध्येही अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी दुधाच्या पावडरची आयात करण्यापोटी लक्षणीय परकीय चलन खर्च करावे लागते, असे या पक्षांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ban on cow slaughter in neighbor country