जमात उद दावावर पाकिस्तानात बंदी

पीटीआय
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

इस्लामाबाद - मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची ‘जमात उद दावा’ ही दहशतवादी संघटना आणि त्यांच्यासाठी निधी गोळा करणाऱ्या फलाह ए इन्सानियत फाउंडेशनवर बंदी घातल्याची घोषणा पाकिस्तानने आज केली. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर आलेल्या जागतिक दबावापुढे झुकून पाकिस्तानला हे पाऊल उचलावे लागले आहे. 

हाफिज सईदविरुद्ध कारवाईची मागणी भारताने वारंवार केली आहे, मात्र पुरावे नसल्याचे तुणतुणे पाकिस्तानने वाजवले होते.

‘‘राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक आज पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तीत बंदीबाबतचा निर्णय घेण्यात आला,’’ अशी माहिती पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने दिली. ‘‘जमात उद दावा आणि फलाह ए इन्सानियत फाउंडेशन या दोन्ही संघटनांना बेकायदा ठरविण्यात आले असून, त्यांचा समावेश बंदी घालण्यात आलेल्या संघटनांमध्ये करण्यात आला आहे,’’ असे प्रवक्‍त्याने म्हटले आहे. या दोन्ही संघटनांवर नजर ठेवण्यात येत होती. 

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमात उद दावामार्फत ३००हून अधिक मदरसे चालविले जातात. त्याशिवाय काही रुग्णालये व प्रकाशन संस्था चालविल्या जातात. सुमारे ५० हजार कार्यकर्ते आणि शेकडो जणांची त्यांनी नियमित वेतनावर नेमणूक केली आहे. 

दहशतवाद आणि कट्टरवाद समाजातून मुळासकट उपटून काढण्याची गरज आहे. देश कधीही अशा शक्तींच्या नियंत्रणाखाली जाणार नाही.
- इम्रान खान, पाकिस्तानचे पंतप्रधान
 
Web Title: ban on Jamaat ud-Dawa in Pakistan