US Election 2020 : बर्नी सॅंडर्स यांची अखेर माघार; ट्रम्प-बिडेन यांच्यात होणार थेट लढत!

Trump-Sanders-Biden
Trump-Sanders-Biden

वॉशिंग्टन : डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते सिनेटर बर्नी सॅंडर्स यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे २०२०मध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सामना जो बिडेन यांच्याशी होणार असल्याचे गुरुवारी (ता.९) स्पष्ट झाले. सॅंडर्स यांनी आपली प्रचार मोहिम स्थगीत केल्याने बिडेन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सर्व अमेरिकी नागरिकांना आर्थिकदृष्ट्या न्याय आणि जागतिक पातळीवर सर्वांसाठी आरोग्य सुविधांचा विकास या दोन महत्त्वाच्या धोरणांचा पाठपुरावा करणाऱ्या सॅंडर्स यांच्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठी चूरस निर्माण झाली होती. मात्र, यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत ट्रम्प यांच्याविरोधात बिडेन हे मजबूत उमेदवार ठरू शकतील असा पक्षाच्या मतदारांचा कौल आहे, असे सांगतानाच आपली प्रचार मोहिम कमी पडल्याची कबुलीही ७८ वर्षीय सॅंडर्स यांनी दिली.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी सुरू असलेली ही लढाई यशस्वी होणार नाही हे मला समजले आहे. त्यामुळे माझी प्रचार मोहिम मी स्थगीत करत बिडेन यांना पाठिंबा दर्शवत आहे, असे सॅंडर्स यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोव्हिड-१९च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आपल्या घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सॅंडर्स यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
२०१६च्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी सॅंडर्स यांनी हिलरी क्लिंटन यांच्यासमोर अतिशय मोठे आव्हान निर्माण केले होते. परंतु, त्या वेळी हिलरी यांनी बाजी मारली होती. त्यानंतर आता २०२०च्या निवडणुकीत सॅंडर्स हे ताकदवान स्पर्धक मानले जात होते.

आपल्या प्रचार मोहिमेच्या सुरवातीपासूनच सॅंडर्स यांनी मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्यात यश मिळविले होते. चालू वर्षाच्या सुरवातीपासून ते आघाडीवर होते. तसेच, पहिल्या तीन राज्यांमध्ये सर्वाधिक मते सॅंडर्स यांनी खेचली होती. मात्र, त्यानंतरच्या प्रायमरीजमध्ये बिडेन यांनी सॅंडर्स यांच्यावर आघाडी घेतली होती. अखेरच्या टप्प्यात बिडेन हे सॅंडर्स यांच्या पुढे निघून गेले होते.

पुरोगामी विचारांचा नेता...
- अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान
- सॅंडर्स यांच्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाला मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्या होत्या
- सॅंडर्स यांच्या सभांनाही लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत होते
- महिलांमध्ये सॅंडर्स यांच्यापेक्षा बिडेन यांची लोकप्रियता अधिक
- सर्वांसाठी आरोग्य सेवा ही सॅंडर्स यांची घोषणा
- आर्थिक न्यायाच्या धोरणाचे कट्टर पुरस्कर्ते

माजी उपाध्यक्ष बिडेन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असतील. मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आमच्या पुरोगामी संकल्पना पुढे घेऊन जाण्यासाठी बिडने यांच्याबरोबर काम करण्यास मी तयार आहे.
- बर्नी सॅंडर्स, डेमोक्रॅटिक सिनेटर

सॅंडर्स हे खरोखर चांगले व्यक्ती असून, महान नेते आहेत. अमेरिकेमध्ये बदल घडविण्याची इच्छाशक्ती असलेला सर्वात शक्तिशाली नेता म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. सॅंडर्स यांच्या समर्थकांच्या पाठिंब्याची मला आवश्यकता आहे.
- जो बिडेन, अध्यक्षपदाच्या शर्यतीतील उमेदवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com