
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गुरुवारी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणार असल्याचेही बायडेन यांनी सांगितले.
वॉशिंग्टन - चीनच्या आक्रमक आणि चुकीच्या आर्थिक धोरणाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चिंता व्यक्त केली. व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गुरुवारी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी फोनवरुन दोन तास चर्चा केली. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणार असल्याचेही बायडेन यांनी सांगितले.
सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर बायडेन यांची चीनशी पहिलीच औपचारिक चर्चा होती. बायडेन यांनी चिनी नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ज्यो बायडेन यांनी भारतीय वेळेनुसार गुरुवारी सकाळी शी जिनपिंग यांच्याशी पहिल्यांदा फोनवरुन चर्चा केली. त्याचवेळी शी जिनपिंग यांनी बायडेन यांना चीन आणि अमेरिकी सहकार्य हा एकमेव मार्ग असून उभय देशातील संघर्ष हा विनाशाकडे घेऊन जाईल, असे सांगितले. दोन्ही देशांनी एकमेकांचा सन्मान करायला हवा आणि परस्परांतील मतभेद वाटाघाटीतून मिटवायला हवेत, अशीही अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अमेरिका आणि चीन अध्यक्षांच्या चर्चेत अपेक्षित मुद्दयांना उल्लेख करण्यात आला. त्यामुळे या चर्चेतून भविष्यातील वाटचालीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता सुतराम नव्हती. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प पूर्व प्रशासनाने चीनबाबत अंगिकारलेले कोणते धोरण पुढे न्यायचे आणि कोणत्या धोरणात बदल करायचा याबाबतच चर्चा झाली. चीनचे चुकीचे आर्थिक धोरण, व्यापारी करार, हॉंगकॉंगमधील कारवाई, शिनजियांग येथील मानवाधिकारांचे उल्लंघन आणि शेजारील देशांविरुद्ध दबावाचे राजकारण यासंदर्भात अमेरिका कडक धोरण अवलंबणार असून कोरोना संसर्ग, हवामान बदल, अण्वस्त्र प्रसार बंदी यासारख्या मुद्द्यावर सहकार्याची भूमिका राहिल, असे म्हटले आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प प्रशासनाने गेल्या चार वर्षात काय केले, यावर विचार करण्यात आला. चीनशी स्पर्धेवरुन ट्रम्प प्रशासनाचा दृष्टीकोन योग्य होता, परंतु या स्पर्धेत ट्रम्प प्रशासनाने घेतलेली भूमिका ही प्रश्न निर्माण करणारी होती. त्यामुळे या स्पर्धेत अमेरिकेची स्थिती कमकुवत बनली, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पेंटागॉनकडून विशेष कृती दल
व्हाइट हाऊसच्या वृत्तानुसार केवळ बायडेनच नाही तर अमेरिकी परराष्ट्र विभागाने देखील चीनबाबतचा दृष्टीकोन स्पष्ट केला आहे. यापुढे चीनने दडपशाहीचे धोरण आणल्यास त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी केली आहे. पेंटागॉनचे विशेष कृती दल याबाबत नियोजन करत असून त्यानुसार रणनिती आखत आहे. त्यावर अमेरिकी सैनिकांकडून कारवाई केली जाईल. जगातील अनेक देशांवर चीन कर्जाच्या माध्यमातून लहान देशांवर दबाव आणतो आणि मनमानी करतो. अमेरिका आता चीनचे हे धोरण संपवण्याची तयारीत आहे. व्हाइट हाऊसने म्हटले की, बायडेन प्रशासन अमेरिकी नागरिकांच्या भावना जाणून आहे. चीनला आता उत्तर दिले जाईल. त्यांना वेळीच प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे.
अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करुन चिनी नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आपण चीनचे चुकीचे आर्थिक धोरण, शिनजियांग येथील मानवाधिकार उल्लंघन, तैवानला धमकी दिल्यावरुन चिंता व्यक्त केली. अमेरिकी नागरिकांचे हित साध्य होत असेल तरच आपण चीनबरोबर सहकार्य करु.
- ज्यो बायडेन, अध्यक्ष