esakal | VIDEO: अवकाश पर्यटनाची दारे खुली; भारतीय वंशाच्या शिरिशाचे यशस्वी भ्रमण
sakal

बोलून बातमी शोधा

Virgin Galactic

अब्जाधीश उद्योगपती रिचर्ड ब्रॅस्नन (वय ७०) यांनी आपल्या पाच सहकाऱ्यांसह ‘व्हीव्हीएस युनिटी’ या विमानातून अवकाशात उड्डाण करत अवकाश पर्यटन क्षेत्राची दारे किलकिली केली.

अवकाश पर्यटनाची दारे खुली; भारतीय वंशाच्या शिरिशाचे यशस्वी भ्रमण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

न्यू मेक्सिको- अब्जाधीश उद्योगपती रिचर्ड ब्रॅस्नन (वय ७०) यांनी आपल्या पाच सहकाऱ्यांसह ‘व्हीव्हीएस युनिटी’ या विमानातून अवकाशात उड्डाण करत अवकाश पर्यटन क्षेत्राची दारे किलकिली केली. त्यांच्या ‘व्हर्जिन गॅलेक्टिक’ कंपनीच्या विमानातून स्थानिक वेळेनुसार सकाळी साडे सात वाजता त्यांचे विमान अवकाशात झेपावले. या मोहिमेत भारतीय वंशाच्या सिरीशा बांदला हिचाही समावेश होता. एक तास दहा मिनिटांचा प्रवास करून त्यांचे विमान धावपट्टीवर यशस्वीपणे परतले. (Billionaire Branson reaches edge of space Virgin Galactic sirisha bandla)

न्यू मेक्सिकोतील वाळवंटात उभारलेल्या अवकाश केंद्रावरून विमानाचे उड्डाण झाले. जेट विमानाच्या आकाराच्या ‘व्हीव्हीएस युनिटी’ या विमानाला जमिनीपासून १३ किलोमीटर उंचीपर्यंत दुसऱ्या मोठ्या विमानाने नेऊन सोडले. त्यानंतर ‘व्हीव्हीएस युनिटी’ने इंजिन सुरु करत ७० किमी उंचीपर्यंत प्रवास केला. अवकाशात प्रवेश करताच चारही जणांनी सीटबेल्ट सोडून चार मिनिटे शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेतला. यानंतर हे विमान पुन्हा अवकाशकेंद्राकडे परतले.

हेही वाचा: गॅस सिलेंडरवरील 'हा' कोड तुमच्या सुरक्षेशी संबंधीत; जाणून घ्या कसा?

खराब हवामानामुळे उड्डाण काही काळ लांबणीवर टाकण्यात आले होते. पर्यटकांना अवकाशात घेऊन जाण्याच्या उद्देशाने रिचर्ड ब्रॅस्नन यांनी २००४ मध्येच ‘व्हर्जिन गॅलेक्टिका’ कंपनीची स्थापना केली होती. दोन ते तीन वर्षांत आपण अवकाश पर्यटन सुरु करू, हा त्यांचा अंदाज चुकीचा ठरला. मात्र, मागे न हटता आज १७ वर्षांनी त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. अर्थात, आजची ही एक चाचणी असून आणखी दोन चाचण्या होणार आहेत. त्यानंतर पर्यटकांना अवकाशात सहलीला घेऊन जाण्यास त्यांच्या कंपनीला परवानगी मिळणार आहे. अवकाश पर्यटनासाठी त्यांच्याकडे ६०० जणांची नावे ‘वेटिंग’वर आहेत. पण त्यांना यासाठी आणखी किमान एक वर्ष वाट पहावी लागणार आहे.

विमानातील प्रवासी

रिचर्ड ब्रॅस्नन, सिरीशा बांदला, डेव्ह मॅकाय, बेथ मोझेस, कोलिन बेनेट आणि मायकेल मासुकी.

अवकाशकेंद्रावर सायकलवरून

अवकाशात प्रवास करण्याचे आपले अनेक वर्षांचे स्वप्न सत्यात उतरत असताना रिचर्ड ब्रॅन्सन यांनी अवकाश केंद्रावर येण्यासाठी सायकलची निवड केली. सायकलवरून अवकाश केंद्रावर पोहोचल्यावर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना मिठी मारली..

loading image