कोरोनाच्या नव्या प्रकारावर BioNTech ने दिली दिलासादायक बातमी

टीम ई सकाळ
Tuesday, 22 December 2020

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. या नव्या प्रकाराच्या भीतीने काही देशांनी ब्रिटनला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे.

बर्लिन - ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. या नव्या प्रकाराच्या भीतीने काही देशांनी ब्रिटनला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. दरम्यान, लस तयार करणारी कंपनी BioNTech ने असा दावा केला आहे की, कोरोना व्हायरस म्युटेशनला रोखणारी किंवा नियंत्रित करणारी व्हॅक्सिन सहा आठवड्यात तयार करू शकतो. 

कंपनीचे सहसंस्थापक उगर साहिन यांनी सांगितलं की, व्हायरसच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी आवश्यक असलेली इम्युनिटी व्हॅक्सिनमुळे तयार होणं शक्य आहे. कोरोनावर सध्याची लस ज्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे त्यामुळे आम्ही नव्या प्रकारावर प्रभावी लस तयार करु शकतो. यासाठी आवश्यक त्या सुविधा आमच्याकडे आहेत. गरज पडल्यास तांत्रिकदृष्ट्या 6 आठवड्यांच्या आत नवीन लस आणू शकतो असंही BioNTech च्या सहसंस्थापकांनी म्हटलं आहे. 

हे वाचा - ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या अवताराने भरली धडकी; जाणून घ्या परिस्थिती!

साहिन यांनी म्हटलं की, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा जो प्रकार आढळला आहे त्यात 9 म्युटेशन आहे. सर्वसामान्यपणे फक्त एक म्युटेशन असतं. फायझरसोबत तयार करण्यात आलेली व्हॅक्सिन प्रभावी असेल. कारण यामध्ये 1 हजारांहून अधिक अमीनो अ‍ॅसिड आहे आणि त्यातील फक्त 9 मध्ये बदल झाला आहे. म्हणजेच 99 टक्के प्रोटीन अजुनही समान आहेत. 

व्हायरसच्या नव्या प्रकारावर टेस्ट सुरु आहेत. पुढच्या दोन आठवड्यात त्याची माहिती मिळण्याची शक्यता असून व्हॅक्सिन व्हायरसच्या नव्या प्रकाराविरोधात प्रभावी ठरेल असा विश्वासही साहिन यांनी व्यक्त केला. मात्र यावर चाचणी झाल्यानंतरच व्हॅक्सिन किती प्रभावी असेल हे समजेल. याबाबत लवकर आकडेवारी आम्ही प्रकाशित करू असंही त्यांनी सांगितलं. 

हे वाचा - आफ्रिकेत आढळला ब्रिटनपेक्षा आणखी वेगळा कोरोना व्हायरस

कोरोनाचा नवा प्रकार आल्यानंतर भारताने नवी गाइडलाइन जारी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्या नियमांनुसार ब्रिटनवरून येणाऱ्या प्रवाशांना ज्यांच्यात कोरोनाचा नवा प्रकार आढळतो त्यांना वेगळ्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात येईल.  याशिवाय पॉझिटिव्ह आढळलेल्या सहप्रवाशांना संस्थांत्मक क्वारंटाइन करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: biontech says vaccine-can-make-in-six-weeks-on corona new strain