
नायजेरियामध्ये बोको हरामच्या दहशतवाद्यांनी शेतामध्ये काम करणाऱ्या 43 कामगारांची निघृण हत्या केली आहे.
अबुजा : नायजेरियामध्ये बोको हरामच्या दहशतवाद्यांनी शेतामध्ये काम करणाऱ्या 43 कामगारांची निघृण हत्या केली आहे. तर सहा कामगारांना जबरी पद्धतीने घायाळ केलं आहे. काल शनिवारी नायजेरियाच्या उत्तर-पूर्व भागात मैदुगुरी शहरात ही घटना घडली. जिहादी विरोधी मिलीशिया यांनी ही माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, या कामगारांना आधी रस्सीने बांधण्यात आलं. त्यानंतर अत्यंत क्रूरपणे त्यांचा गळा कापण्यात आला.
हेही वाचा - ना बहुमत, ना शांतता; POK गिलगिट-बाल्टिस्तानमधील निवडणुका ठरतायत पाक सरकारसाठी डोकेदुखी
या घटनेतून वाचणाऱ्या लोकांची मदत करणाऱ्या मिलिशिया नेता बाबाकुरा कोलो यांनी सांगितलं की आम्हाला घटनास्थळी 43 मृतदेह मिळाले आहेत. सगळ्यांची अत्यंत निघृणरित्या हत्या करण्यात आलीय. त्यांनी पुढे म्हटलंय की, हे काम बोको हरामचंच आहे, यात काही शंका नाही. या भागात सक्रिय असणारा बोको हराम या भागात सातत्याने असे हल्ले करतो. नायजेरियाचे राष्ट्रपाती मोहम्मदू बुहारी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटलंय की, या हत्यांमुळे संपूर्ण देश घायाळ झाला आहे. आणखी एक मिलिशिया इब्राहिम लिमन यांनी सांगतिलं की, या घटनाक्रमात मारले गेलेले कामगार उत्तर पश्चिम नायजेरियाच्या सोकोतो राज्यातील होते. हे सर्व लोक कामाच्या शोधात या भागात आले होते. लिमन यांनी म्हटलं की, 60 कामगारांना धान्याच्या शेतात काम करण्याची जबाबदारी सोपवली गेली होती.
आठ लोक अद्याप बेपत्ता
लिमन यांनी सांगितलं की, बोको हरामच्या हल्ल्यात 43 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि सहा लोक घायाळ झाले आहेत. तर आठ लोक अद्याप बेपत्ता आहेत. दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं असल्याचं बोललं जातंय. त्यांच्या शोधकार्यात मदत करणाऱ्या एका स्थानिक नागरिक माला बुनुने म्हटलंय की, त्यांच्या मृतदेहांना जाबरमारी गावाकडे नेलं गेलंय जिथे त्यांना रविवारी दफन करण्यात येणार आहे.
हेही वाचा - चीन, रशियाच्या कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध
आतापर्यंत 20 लाख लोक झाले आहेत स्थलांतरीत
मागच्या महिन्यात बोको हरामच्या दहशतवाद्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मैदुगुरीच्या जवळ शेतात काम करणाऱ्या 22 शेतकऱ्यांची, कामगारांची, मच्छीमारांची हत्या केली होती. बोको हराम यांनी या लोकांवर हेरगिरी करणे तसेच सैन्याला माहिती देण्याचा ठपका ठेवत खात्मा केला होता. 2009 नंतर जवळपास 36 हजार लोकांची अशाप्रकारे हत्या करण्यात आली आहे. तसेच जवळपास 20 लाख लोकांनी भीतीपोटी स्थलांतर केलं आहे.