Pakistan : बुरखा घातलेल्या महिलेने घडवला बॉम्बस्फोट; जवान सुरक्षेत होते तैनात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bomb blast at Karachi University in pakistan

Pakistan : वर्षभरात चिनी नागरिकांवर तिसरा हल्ला; जवान सुरक्षेत होते तैनात

पाकिस्तानातील कराची विद्यापीठात बुरखा घातलेल्या महिलेने बॉम्बस्फोट (Bomb blast) घडवून आणला. या स्फोटात तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. वर्षभरात पाकिस्तानात चिनी नागरिकांवर झालेला हा तिसरा हल्ला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कराची शहरात असलेल्या विद्यापीठात हा प्रकार घडणे ही मोठी घटना आहे. (Bomb blast at Karachi University in pakistan)

ज्या चिनी नागरिकांना लक्ष्य करण्यात आले ते चिनी भाषेचे शिक्षक होते. त्यांचे रक्षण पोलिस करीत होते. हे रेंजर्स मोटारसायकलवरून व्हॅनला एस्कॉर्ट करीत असताना चिनी शिक्षकांचे रक्षण करीत होते. सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी या घटनेची दखल घेतली असली तरी अधिकाऱ्यांनी अद्याप या स्फोटावर भाष्य केलेले नाही.

हेही वाचा: चिमुकलीने चुकून घेतला व्हिस्कीचा घोट; आजीने पाजली अर्धी बॉटल अन्...

२३ नोव्हेंबर २०१८ रोजी कराचीतील चिनी वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये दोन पोलिस कर्मचारी आणि दोन पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला होता. तासभर चाललेल्या या कारवाईत तिन्ही हल्लेखोर ठार झाले. या हल्ल्यात एकही चिनी नागरिक जखमी किंवा ठार झाला नाही.

चीन राजनैतिक एजन्सींवर कोणत्याही हिंसक हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. हल्ल्यानंतरही चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्प पुढे जाईल, असे या घटनेनंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. त्यावेळी पाकिस्तानमधील चिनी दूतावासातील मिशनचे डेप्युटी चीफ झाओ लिजियान यांनी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी वेळेवर आणि योग्य कारवाई केल्याबद्दल पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांचे कौतुक केले होते.

हेही वाचा: जयशंकर यांनी पुन्हा एकदा युक्रेनवर युरोपीय देशांना सुनावले; म्हणाले...

२० ऑगस्ट २०२१ रोजी बलुचिस्तानमधील ग्वादर ईस्ट बे एक्सप्रेसवे प्रकल्पात चिनी जवानांवर आत्मघातकी बॉम्बरने हल्ला झाला. या हल्ल्यात एक चिनी नागरिक जखमी झाला तर दोन स्थानिक मुलांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर जखमींना योग्य उपचार द्यावेत, हल्ल्याची सखोल चौकशी करावी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी पाकिस्तानकडून करण्यात आल्याचे चीनने म्हटले होते. तसेच पाकिस्तानमधील चिनी दूतावासाने चिनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते.

१४ जुलै २०२१ रोजी खैबर पख्तूनख्वामधील अप्पर कोहिस्तान जिल्ह्यातील दासू हायड्रोपॉवर येथे काम करणाऱ्या चिनी कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात चार पाकिस्तानी (Pakistan) नागरिक आणि नऊ चिनी नागरिकांसह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात २८ जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर चीनने पाकिस्तानला खडसावले होते.

चार जवानही या स्फोटात जखमी

मंगळवारी (ता. २६) कराची विद्यापीठाच्या कन्फ्युशियस इमारतीजवळ स्फोट झाला आहे. सिंध पोलिस प्रमुखांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. पांढऱ्या व्हॅनचा स्फोट (Bomb blast) झाला आणि त्यानंतर धूर पसरल्याचे पाकिस्तानी टीव्ही चॅनेलवरील फुटेजमध्ये दिसत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल पाठवले आहेत. हा बॉम्बस्फोट आत्मघातकी स्फोटासारखा दिसत आहे. या बॉम्बस्फोटात (Bomb blast) बुरखा घातलेल्या महिलेचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. व्हॅनचे रक्षण करणारे पाकिस्तानी लष्कराचे चार जवानही या स्फोटात जखमी झाले आहेत, असे कराचीचे पोलिस प्रमुख गुलाम नबी मेमन यांनी सांगितले.

Web Title: Bomb Blast At Karachi University Four Killed Pakistan Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..