esakal | इस्रायलच्या पार्श्वभूमीवर भारतातही मिळणार बूस्टर डोसला परवानगी?
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccines

इस्रायलच्या पार्श्वभूमीवर भारतातही मिळणार बूस्टर डोसला परवानगी?

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने काल सोमवारी Pfizer-BioNTech लशीचा तिसरा डोस घेण्यास परवानगी दिली आहे. ज्या लोकांना या लशीचे दोन्ही डोस देऊनही पुरेश्या अँटीबॉडीज तयार झालेल्या नाहीयेत आणि ज्यांची प्रतिकार शक्ती अजूनही कमकुवत आहे, अशा व्यक्तींना कोरोना लशीचा हा तिसरा बूस्टर डोस घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, आता या पार्श्वभूमीवर हा प्रश्न निर्माण होतोय की, भारतातही कोरोनाच्या अशा तिसऱ्या बूस्टर डोसला परवानगी मिळेल का? या तिसऱ्या बूस्टर डोसची गरज भारतात आहे का? हे प्रश्न महत्त्वाचे ठरतात.

हेही वाचा: Booster Dose: काय असतो बूस्टर डोस? तो कधी द्यावा लागतो?

हा तिसरा डोस कुणाला घेता येईल, याबाबतची यादी इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. यामध्ये हृदय, फुप्फुस आणि किडनी प्रत्यारोपण झालेले तसेच कमकुवत प्रतिकार शक्ती असणारे आणि कॅन्सरच्या रुग्णांना हा तिसरा डोस घेता येईल.

कोरोना विषाणू सातत्याने आपले स्वरुप बदलताना दिसून येत आहे. यामध्ये डेल्टा प्लस, लॅम्बडा आमि कप्पा व्हेरियंट यांसारखे नवनवे व्हेरियंट्स जगभरात आढळून येत आहेत. कोरोना व्हायरस सतत आपलं स्वरुप बदलत असल्याने कोरोनावरील लस बनवणाऱ्या कंपन्या देखील याबाबत सतर्क झाल्या आहेत. कारण व्हायरसच्या या बदललेल्या स्वरुपावर बनवलेली लस कितपत प्रभावी ठरेल, याची तपासणी सध्या सुरु आहे. एकीकडे भारतातील संपूर्ण लोकसंख्येला कोरोनाचे दोन डोस देण्यासाठीच मोठ्या कष्टाने प्रयत्न सुरु आहेत. त्यात आता कोरोनाच्या तिसऱ्या बूस्टर डोसची चर्चा सुरु झाली आहे. कोरोनाच्या या महासाथीच्या दीर्घ काळात टिकून राहण्यासाठी कोरोनाच्या या तिसऱ्या बूस्टर डोसची आवश्यकता बोलून दाखवली जात आहे.

हेही वाचा: पृथ्वीवर आदळणार सोलार वादळ; मोबाईल सिग्नल, GPS होणार प्रभावित

जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हस्कुलर सायन्सेस अँड रिसर्चमध्ये सुरू असलेल्या अभ्यासानुसार असे सूचित केलं गेलंय की, दोन डोस दिल्या गेलेल्या जवळजवळ 15 ते 20% लोकांना तिसऱ्या बूस्टर डोसची आवश्यकता भासणार आहे. कारण दोन्ही डोस घेतलेल्या 300 जणांच्या केलेल्या चाचणीत केवळ 80 टक्के लोकांमध्येच पुरेश्या अँटीबॉडीज निर्माण झाल्याचं आढळून आलं आहे.

“इतर आजारांच्या इम्यूनोलॉजिकल वेळापत्रकानुसार आणखी एक बूस्टर शॉट अनिवार्य असतो. शेवटच्या डोसच्या सहा महिन्यांनंतर असा बूस्टर आवश्यक आहे,” असे विषाणूतज्ज्ञ प्रख्यात प्राचार्य डॉ. टी. जेकब जॉन यांनी सांगितलंय.

अमेरिकेत बूस्टर डोस दिला जाईल का याबाबत अमेरिकेचे आरोग्य तज्ज्ञ डॉ. अँथोनी फौची यांनी म्हटलंय की, अमेरिकन नागरिकांना लशीच्या बूस्टर डोसची भविष्यात गरज भासू शकते. मात्र, आता नाही. जर का हा बूस्टर डोस कधी दिला जावा, यासंदर्भात चर्चा झाल्या तर आम्ही त्याबद्दल ऐकून घेऊ. मात्र, हे एखाद्या फार्मास्युटिकल कंपनीच्या घोषणेवर नव्हे तर सर्वसमावेशक अभ्यासावर आधारित असेल, असंही त्यांनी म्हटलंय. भारतात यासंदर्भात अद्यापतरी प्रशासकीय पातळीवर कसल्याही चर्चा सुरु झालेल्या नाहीयेत. मात्र, यासंदर्भातील निर्णय कोरोनाच्या लढाईतील महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.

loading image