बॉयकॉट चायनीज प्रॉडक्ट मोहिमेचं चीनला मिरच्या झोंबल्या; वाचा चीनचा ग्लोबल टाईम्स काय म्हणतोय...

China Global times.jpg
China Global times.jpg

बीजिंग : भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून लडाख मधील सीमारेषेवरून मतभेद असतानाच, सोमवारी १५ जून रोजी भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात झालेला संघर्ष हा दुर्देवी असल्याचे चीनच्या ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. चीन सरकारच्या मालकीचे असलेल्या या दैनिकामध्ये भारत आणि चीन यांच्या संबंधांवर भाष्य करताना, भारताने चीनसोबत असलेल्या सीमावादावरून चीनशी असलेले आर्थिक संबंध तोडू नयेत, या आशयाचा लेख प्रसिद्ध केला आहे. या लेखात भारत आणि चीन हे आशियातील दोन उदयोन्मुख देश असल्याचे म्हटले आहे. 

भारत आणि चीन या दोन देशांमध्ये मे महिन्यातील ५ तारखेपासून पूर्व लडाख मधील गलवान खोरे, पेंगोंग त्सो, डोमचाक आणि दौलत बेग ओल्डी या भागातील वर्चस्वावरून वाद उफाळला आहे. त्यानंतर या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी प्रशासकीय व लष्करी पातळीवर चर्चा सुरु केली होती. मात्र सोमवारी १५ जून रोजी रात्री भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात मोठी  धुमश्चक्री झाली होती. ज्यामध्ये भारताच्या एका लष्करी अधिकाऱ्यासह २० जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर भारताने लडाख मधील आपली लष्करी कुमक वाढवण्यासोबतच, सरकारी सेवेतील चीनच्या गुंतवणुकीला काही प्रमाणात आवर घालण्याचा निर्णय घेतला होता. तर देशभरातील वातावरण देखील चीन विरोधात तापले असून, चीनी व्यापारावर बंधने घालण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळेच चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्स मध्ये आज सीमावादावरून भारताने चीनशी असलेले आर्थिक संबंध तोडू नयेत असे म्हटले आहे. 

१५ जून रोजी भारत आणि चीन यांच्यातील सैन्यात झालेला संघर्ष हा दुर्देवी असल्याचे ग्लोबल टाइम्सच्या या लेखात म्हटले असून, या घटनेचा वापर भारत व भारताबाहेरील राजकारणी व षड्यंत्र आखणाऱ्यांनी चीनच्या विरोधात द्वेष आणि राष्ट्रावादासाठी केला जाऊ नये, असे म्हटले आहे. तसेच दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता असेल तरच, भारत आणि चीन या आशियातील दोन उदयोन्मुख देशांमध्ये घनिष्ट व्यापार आणि आर्थिक संबंध वाढवू शकत असल्याचे म्हणत, याचा दोन्ही देशातील जनतेला फायदा होणार असल्याचे अधोरेखित केले आहे. याशिवाय सीमेवरील स्फोटक परिस्थिती निवळण्यासाठी दोन्ही देशांनी त्यांच्या शक्तीनुसार, द्विपक्षीय संबंध अधिक बिघडू नये म्हणून सर्व काही करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. आणि तिसऱ्या देशाच्या युद्ध अथवा सीमेवरील वादास भडकावण्यासंदर्भात नवी दिल्लीने कोणत्याही परिस्थितीत बळी पडू नये म्हणून सावधगिरी बाळगण्याचे या लेखामध्ये उद्धृत केले आहे. 

तसेच, या लेखात पुन्हा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या आरोपाचा पुनरुच्चार करण्यात आला असून, भारतीय सैन्याने प्रथम प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडत घुसखोरी केल्याचे म्हटले आहे. व बीजिंगने भारताला सीमावादावर शांततेने कार्य करत, घुसखोरीच्या सखल चौकशीची मागणी करण्यात आल्याचे नमूद केले आहे. तर या सर्व घटनेदरम्यान, भारतातील माध्यमांनी अत्यंत बेजाबदारपणे विश्लेषण करत चीनच्या विरोधात जनतेला भडकावले असल्याचा आरोप केला आहे. याव्यतिरिक्त भारताने आशियातील भू-राजनैतिक तणाव खासकरून, चीन आणि पाकिस्तान सोबत असलेल्या सीमावादावरून वाढवू नयेत, असा सल्ला या लेखात देण्यात आला आहे.              
      
दरम्यान, यापूर्वी देखील ग्लोबल टाइम्सने सीमावादात अर्थकारण आणणे घातक असल्याचे म्हटले होते. याअगोदरच्या लेखात ग्लोबल टाइम्सने सीमावादात व्यापार, गुंतवणूक अर्थकारण आणणे चूक असल्याची तक्रार केली होती. व आशिया खंडातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताकडून ही अपेक्षा नसल्याचे म्हटले होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com