esakal | ब्राझीलमध्ये कोरोनाचा तांडव; महिन्यात 1 लाख मृत्यू

बोलून बातमी शोधा

brazil

ब्राझीलमध्ये कोरोनाने हाहा:कार माजला असून महिनाभरात सुमारे १ लाख लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ४ लाखांवर पोचली आहे.

ब्राझीलमध्ये कोरोनाचा तांडव; महिन्यात 1 लाख मृत्यू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साओ पावलो (ब्राझील)- ब्राझीलमध्ये कोरोनाने हाहा:कार माजला असून महिनाभरात सुमारे १ लाख लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ४ लाखांवर पोचली आहे. मृतांत ब्राझील जगात दुसऱ्या क्रमांकावर पोचला आहे. यादरम्यान आरोग्य तज्ञांनी देशातील स्थिती आणखी बिघडू शकते, असा इशारा दिला आहे. एप्रिल महिन्यात ब्राझीलमध्ये कोरोना संसर्गाने सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या पहिल्या दोन दिवसात चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन आठवड्यात दररोज २४०० जणांचा मृत्यू होत आहे तर गुरुवारी ३००१ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील मृतांची संख्या ४०१, १८६ वर पोचली आहे. मात्र आरोग्य मंत्रालयाने बाधित होण्याचे प्रमाण आणि मृतांची संख्या पूर्वीच्या तुलनेत काही प्रमाणात कमी झाल्याने समाधान व्यक्त केले आहे. परंतु संसर्गाची आणखी एक लाट येण्याची शक्यता आरोग्य तज्ञांनी वर्तविली आहे. ही लाट युरोपीय देशांत पाहावयास मिळाली.

हेही वाचा: भारत ब्राझील, अमेरिकेलाही मागे टाकतोय; देशात, 5 राज्यांमध्ये कोरोनाचा कहर

ऑनलाइन रिसर्च संकेतस्थळ अवर वर्ल्ड इन डेटा यांच्या मते, ब्राझीलमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असून देशातील सहा टक्क्यांपेक्षा कमी लोकांना लस मिळाली आहे. अध्यक्ष जेयर बोल्सोनारो यांनी म्हटले की, आपण सर्वात शेवटी लस घेऊ. या वेळी त्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध लागू करण्यासंदर्भात महापौर आणि गर्व्हनरवर टीका केली. आरोग्य मंत्रालयाच्या साथरोग आजारातील तज्ञ वेंडरसन ओलिविरा यांनी जूनच्या मध्यापर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे.