esakal | कोरोनामुळे आर्थिक परवड; झोपडपट्टीवासियांनी सुरु केली स्वत:चीच बँक
sakal

बोलून बातमी शोधा

BRAZIL

2020 वर्ष कोरोना महामारीचे राहिले. या काळात सर्व उद्योग-धंदे बंद पडले होते.

कोरोनामुळे आर्थिक परवड; झोपडपट्टीवासियांनी सुरु केली स्वत:चीच बँक

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

ब्राझीलीया- 2020 वर्ष कोरोना महामारीचे राहिले. या काळात सर्व उद्योग-धंदे बंद पडले होते. आताकुठे हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असली, तरी अनेक देशांमध्ये कोरोनाचा हाहाकार अजूनही सुरुच आहे. कोरोना महामारीने सर्वाधिक हैराण झालेल्या देशांपैकी ब्राझील हा एक देश आहे. कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका ब्राझीलमधील झोपडपट्टीभागात राहणाऱ्या लोकांना बसला. कोरोना महामारीच्या काळात या लोकांना आपले काम गमवावे लागले. त्याची आर्थिक झळ त्यांना आताही सोसावली लागत आहे. याच संकटातून बाहेर पडण्यासाठी देशातील 10 मोठ्या झोपडपट्ट्यांनी स्वत:ची बँक सुरु करण्याचा मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. 

पाकिस्तानला दणका; इराणने सर्जिकल स्ट्राइक करुन सोडवले सैनिक

कोरोना महामारीची झळ सर्वाधिक गरिब लोकांना बसली. विशेष करुन झोपडपट्टी भागात राहणाऱ्या लोकांना दाट लोकवस्तीमुळे कोरोनाने अधिक छळले. त्याच बरोबर या काळात लोकांच्या हातचे काम गेल्यामुळे, त्यांना सर्व पातळ्यांवर अचडणींचा सामना करावा लागला. पण, अशा परिस्थितीतही ब्राझीलच्या लोकांनी संकटाशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची G10 बँक लवकरच सुरु होणार असून याद्वारे अडचणीत असणाऱ्या छोट्या उद्योगांना कर्ज पुरवले जाणार आहे. तसेच पारंपरिक बँक सुविधेपासून वंचित राहिलेल्या झोपडपट्टी रहिवाशांना डेबिट कार्डची सेवा दिली जाणार आहे. 

कोरोना महामारीमुळे मृत्यू पावलेल्यांमध्ये ब्राझिलचा अमेरिकेनंतर दुसरा क्रमांक लागतो. आतापर्यंत देशात 2,25,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना बसला. झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे लोक प्रामुख्याने अनौपचारिक क्षेत्रात काम करतात. घरकाम, लहान मुलांची काळजी घेणे, छोटा-मोठा व्यवसाय अशी कामे ही लोक करत होती. पण, कोरोना काळात सर्व काही बंद पडलं. त्यामुळे देशातील बेरोजगारीचा दर विक्रमी 14.6 टक्क्यांपर्यंत पोहोचला. 

ग्रेटाच्या ट्विटनंतर FIR; दिल्ली पोलिसांनी केला मोठा खुलासा

ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी आपात्कालीन परिस्थितीसाठी गरीबांना महिन्याला 110 डॉलर देण्याची घोषणा केली होती, काही काळाने या रकमेत घट करण्यात आली. पण, 2020 च्या शेवटी ही योजना सरकारकडून बंद करण्यात आली. अशावेळी ब्राझीलमधील अनेक लोकांना दररोजचे जेवण मिळणेही कठीण झाले. अशा लोकांसाठी बँक किंवा डेबिट कार्ड कधीच पर्याय नव्हता. या लोकांना पारंपरिक कर्ज कोणतीही बँक देण्यास तयार नव्हती. 

2019 च्या एका रिपोर्टनुसार जवळपास 4.5 कोटी ब्राझीलीयन लोकांकडे बँक अकाऊंट नाहीत. g10 बँकेने ही कमतरता भरुन काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. G10 बँकेचे ग्राहक झोपडपट्टी रहिवाशी असणार आहेत. बँक या लोकांना कमी व्याजाचे कर्ज ऑफर करणार आहे. शिवाय त्यांना डेबिट कार्डची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. G10 बँकेमध्ये अज्ञात लोकांनी गुंतवणूक केली आहे. G10 बँक झोपडपट्टीतील रहिवाशांना पुन्हा उभारी घेण्यात मदत करेल अशी आशा आहे. 


 

loading image