ग्रेटाच्या ट्विटनंतर FIR; दिल्ली पोलिसांनी केला मोठा खुलासा

टीम ई सकाळ
Thursday, 4 February 2021

पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनेही ट्विटरवर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. यानंतर दिल्ली पोलिसांनी ग्रेटाविरोधात एफआयआर दाखल केली होती. आता याबाबत पोलिस आयुक्त प्रवीर रंजन यांनी खुलासा केला आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान , या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात असून अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावर आंदोलनाला पाठिंबा दिला. यानंतर देशात अनेक सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलन हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे म्हणत मोहिम सोशल मीडियावर सुरु केली. दरम्यान, पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनेही ट्विटरवर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. यानंतर दिल्ली पोलिसांनी ग्रेटाविरोधात एफआयआर दाखल केली होती. आता याबाबत पोलिस आयुक्त प्रवीर रंजन यांनी खुलासा केला आहे.

पोलिस आयुक्त म्हणाले की, आम्ही एफआयरमध्ये कोणाचंही नाव लिहिलेलं नाही. एफआयआर फक्त टूलकिट तयार करणाऱ्यांविरोधात आहे. त्याचा तपास केला जाईल. एफआय़आरमध्ये कलम 124 A हे देशद्रोहाबाबत आणि  कलम 153 अंतर्गत सामाजिक वातावरण बिघडवण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

हे वाचा - शेतकरी आंदोलनात मोदी सरकारविरोधात वाजपेयींच्या VIDEO चा 'उतारा'

गुन्हे शाखेचे विशेष पोलिस आयुक्त प्रवीर रंजन यांनी म्हटलं की, दिल्लीत शेतकरी आंदोलनावेळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिल्ली पोलिसांनी बारीक नजर आहे. 300 पेक्षा जास्त ट्विटर हँडलवर लक्ष ठेवले होते. शेतकरी आंदोलनावरून सुरु असलेल्या तपासामध्ये सोशल मीडियासुद्धा आहे. दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया हँडल्सविरोधात गुन्हाही दाखल केला होता. यामध्ये चुकीची माहिती पसरवणाऱ्या अकाउंटचा समावेश आहे. 

टूलकिटच्या माध्यमातून वातावरण खराब करण्याची आणि भारत सरकारची प्रतिमा खराब करण्याचा कट रचला होता. टूलकिटवर आमचे लक्ष आहे. त्याची चौकशी होत आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये कलम 124 A (sedition), 153A, 153 आणि 120 B  अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये ग्रेटाचे नाव नाही. तिच्या ट्विट आणि टूलकिटवर आम्ही गुन्हा नोंद करून तापस करत आहे.

हे वाचा - Fact Check: खरंच अण्णा हजारेंचा भाजप प्रवेश झालाय? जाणून घ्या सत्य

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनंतर ग्रेटा थनबर्गने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. यामध्ये तिनं म्हटलं की, मी शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनासोबत आहे. कोणी तिरस्कार केला, धमकी दिली तरी बदलणार नाही. याआधीही तिने ट्विटमधून भारतातील शेतकरी आंदोलनासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहे असं म्हटलं होतं. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi police clarification fir against tweet and toolkit not greta thunberg