देशाला कोरोनाचा दणका तरीही राष्ट्राध्यक्ष म्हणतात लस टोचून घेणार नाही

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असताना जगातील काही दिग्गज नेत्यांनी अनेकदा याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नसल्याचं समोर आलं आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मास्क न घालण्याची भूमिका घेतली होती. 

रिओ डी जानेरो - कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असताना जगातील काही दिग्गज नेत्यांनी अनेकदा याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नसल्याचं समोर आलं आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मास्क न घालण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर ट्रम्प यांना कोरोनाची लागणही झाली होती. आता ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो यांनी  कोरोनाला कमी लेखत आरोग्यविषयक निर्बंधांची खिल्ली उडवण्याचे धोरण कायम ठेवले आहे.

कोरोनाची लस घेणार नसल्याचे बोल्सोनारो स्पष्ट केले. त्याचवेळी लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल तेव्हा ती टोचून घेणे जनतेला बंधनकारक नसेल. तसा निर्णय काँग्रेस (ब्राझीलची विधीमंडळ संस्था) ठरवणार असल्याचे संकेत त्यांनी दिले सोशल मिडीयासह अनेक माध्यमांनी त्यांच्या वक्तव्याचे थेट प्रक्षेपण केले. मी तुम्हाला सांगतो आहे की, मी काही लस घेणार नाही. तो माझा अधिकार आहे असंही त्यांनी म्हटलं. 

हे वाचा -जर्मनीत कोरोनाची दुसरी लाट; कडक निर्बंधांसह लॉकडाऊनचा कालावधी वाढला

वास्तविक कोरोनाच्या आकडेवारीत ब्राझील जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जुलैमध्ये बोल्सोनारो यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना स्वयं-विलगीकरण करून घ्यावे लागले होते. मास्क घालण्याच्या परिणामकारकतेबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. त्यामुळे विषाणू संसर्गाला प्रतिबंध होण्याचे फार थोडे निर्णायक पुरावे मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

लस फक्त कुत्र्याला
कोरोनाची जागतिक साथ सुरू झाल्यापासून बोल्सोनारो यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. एकदा पत्रकारांशी बोलताना त्यांनी मास्क काढून आपला चेहरा किती ताजातवाना आहे हे बघण्यास सांगितले होते. अलिकडेच लस येईल तेव्हा ती टोचून घेणे केवळ आपल्या कुत्र्याला गरजेचे असेल, असेही ते म्हणाले होते.

हे वाचा - ...तर मी व्हाईट हाऊस निश्चितपणे सोडेन; ट्रम्प यांची गाडी हळूहळू रुळावर

ब्राझीलमध्ये आतापर्यंत 62 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 1 लाख 71 हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगातील सर्वाधिक कोरोनाचा फटका बसलेल्या देशांमध्ये ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. 62 लाखांपैकी 55 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brazil president bolsonaro say he will not take covid 19 vaccin