
युरोपातील अनेक प्रगत राष्ट्रातही कोरोनाच्या प्रादुर्भावाला संपूर्णत: आटोक्यात आणण्यात यश प्राप्त झालं नाहीये.
बर्लिन : गेल्या एक वर्षांहून अधिक काळ कोरोनाचा विषाणू संपूर्ण जगभरात हाहाकार माजवतो आहे. भारतातही कोरोना संक्रमणामुळे अवस्था बिकट झाली आहे. युरोपातील अनेक प्रगत राष्ट्रातही कोरोनाच्या प्रादुर्भावाला संपूर्णत: आटोक्यात आणण्यात यश प्राप्त झालं नाहीये. अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा एकदा निर्बंध कडक करुन लॉकडाऊन लावण्यात आला आहे. जर्मनीमध्येही कोरोना प्रादुर्भावाच कहर पाहता 20 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांनी संघ राज्यांचे मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतरच्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं की, जर्मनी कोरोना व्हायरसशी निगडीत प्रतिबंधांना 20 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहे. यासोबतच जर्मनीमध्ये कोरोनाशी निगडीत नियमावलीची मर्यादा देखील जानेवारीपर्यंत वाढवण्यात येत आहे.
हेही वाचा - ...तर मी व्हाईट हाऊस निश्चितपणे सोडेन; ट्रम्प यांची गाडी हळूहळू रुळावर
जर्मनीत आतापर्यंत 2 नोव्हेंबर पर्यंत अंशत: लॉकडाऊन लागू केलं गेलं होतं. मर्केल यांनी बुधवारी उशीरा रात्री म्हटलं की महासंघ आणि संघ राज्यांच्या वक्तव्यात म्हटलंय की, आम्ही नोव्हेंबरच्या अखेरीस लागू केलेले प्रतिबंध काढू शकत नाही. जर्मनीमध्ये आतापर्यंत एकूण 9.85 लाख कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत जवळफास 15 हजार लोकांचा यामुळे मृत्यूही झाला आहे.
हेही वाचा - जर्मनीला हवी स्की रिसॉर्टवर बंदी - अँजेला मर्केल
सणासुदीच्या काळातही जर्मनीमध्ये कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आली नाहीये. दोन कुटुंबातील जास्तीतजास्त पाच सदस्यांनाच एकमेकांसोबत भेटण्याची परवानगी असेल. मात्र, ख्रिसमसपासून ते नव्या वर्षाच्या दरम्यान म्हणजेच 23 डिसेंबरपासून ते 1 जानेवारीपर्यंत अधिकाधिक 10 लोक एकमेकांना भेटू शकतात. यामध्ये 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचा समावेश केला गेला नाहीये. सोबतच अशी सूचना केली गेलीय की, या ख्रिसमसच्या आधी आणि नव्या वर्षानंतर लोकांनी स्वत:च काळजी घेऊन स्वत:ला क्वारंटाईन करावं जेणेकरुन या संक्रमणाचा कसलाही धोका राहणार नाही. कंपन्यांना डिसेंबरमध्ये कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुट्ट्या द्यायला सांगितलं गेलं आहे. जर हे शक्य नसेल तर त्यांना वर्क फ्रॉम दिलं जावं, अशी सुचना करण्यात आली आहे.