मोदी-जिनपिंग यांचा सहकार्याचा नारा

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

उवाच...
- स्मार्टसिटी, नागरीकरण, आपत्ती व्यवस्थापन यामधील सहकार्य वाढवावे
- पर्यावरणासाठी पुढील दशक महत्त्वाचे
- भारतातही अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या सुधारणा

 

विकासासाठी भागीदार आवश्‍यक

शियामेन : आर्थिक विकास साधण्यासाठी ब्रिक्‍स देशांनी एकमेकांमध्ये सशक्त भागीदारी निर्माण करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज "ब्रिक्‍स' परिषदेत केले. जगाची अनिश्‍चिततेकडे वाटचाल होत असताना ब्रिक्‍स देशांनीच स्थैर्य आणण्यात मोलाची कामगिरी बजावली, असा दावाही मोदी यांनी या वेळी केला.

"ब्रिक्‍स' परिषदेच्या उद्‌घाटनाच्या सत्रात बोलताना मोदी यांनी व्यापार आणि अर्थव्यवस्था हे या गटाचे आधारस्तंभ असल्याचे सांगितले. हे आधारस्तंभ अधिक मजबूत करण्यासाठी एकमेकांमध्ये सहकार्य आवश्‍यक असल्याचे सांगत मोदींनी सहकार्य वाढविण्यासाठी काही मार्गही सांगितले. विकसनशील देशांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी "ब्रिक्‍स'ने गुणांकन पद्धत सुरू करण्याचा सल्ला मोदींनी दिला. "संशोधन आणि डिजिटल अर्थव्यवस्था या क्षेत्रात "ब्रिक्‍स' देशांनी सहकार्य वाढविल्यास विकास आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होईल. सदस्य देशांच्या मध्यवर्ती बॅंकांनी आपल्या क्षमता वाढवून जागतिक अर्थ संस्थाबरोबरील सहकार्य वाढवावे,' असे मोदी म्हणाले.

अपारंपरिक ऊर्जेवरही मोदींनी आपल्या भाषणात भर दिला. भारत आणि फ्रान्सने 2015 मध्ये स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीबरोबर काम करून सदस्य देश शुद्ध ऊर्जेचा प्रसार करू शकतात. यासाठी विकास बॅंकेकडूनही निधी मिळू शकतो, असे मोदी म्हणाले. कौशल्य विकासावर भर देताना मोदी यांनी आरोग्य, पायाभूत सुविधा, उत्पादन आणि दळणवळण या क्षेत्रांमध्ये आफ्रिकेतील देशांशीही सहकार्य वाढविण्याचे आवाहन केले.

आर्थिक सहकार्य वाढावे : जिनपिंग
"ब्रिक्‍स' देशांनी आर्थिक सहकार्य वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज परिषदेच्या उद्‌घाटनावेळी केले.
"एकमेकांच्या सहकार्याचा पुरेपूर वापर करून घेत आपण विकास साधायला हवा. ब्रिक्‍समधील सदस्य देशांची एकूण परकी गुंतवणूक 197 अब्ज डॉलरची असताना एकमेकांच्या देशांत यापैकी केवळ 5.7 टक्के आहे. जगभरात अत्यंत स्पष्टपणे आणि महत्त्वाचे बदल घडत असताना "ब्रिक्‍स' देशांनी एकमेकांना धरून राहणे आवश्‍यक आहे. जागतिक राजकारणात आपण अधिक सहभाग घेणे आवश्‍यक आहे. आपल्या मदतीशिवाय अनेक जागतिक समस्या सुटणार नाहीत,' असे जिनपिंग म्हणाले. व्यापार, गुंतवणूक, अर्थ, दळणवळण, शाश्‍वत विकास, संशोधन, उद्योग या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. सदस्य देशांनी एकमुखाने जागतिक शांततेसाठी आवाज उठवावा आणि शांततेसाठी लोकशाहीच्या मूल्याचे जतन आवश्‍यक आहे, असेही जिनपिंग म्हणाले.

ब्रिक्‍स देशांदरम्यान आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य वाढविण्यासाठी चीन योजना तयार करेल आणि यासाठी 7.6 कोटी डॉलर मदत देईल, असे जिनपिंग यांनी आज जाहीर केले. आर्थिक क्षेत्रामध्ये धोरण साहाय्य आणि सहकार्य वाढविण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल, असे ते म्हणाले.

Web Title: brics 2017 narendra modi-Jinping collaboration slogan