'ब्रिक्‍स' जाहीरनाम्यात "लष्करे', जैशे'चा समावेश

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

पाकचे पाठबळ असल्याच्या भारताच्या दाव्याला पुष्टी

शियामेन : दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये आश्रय दिला जातो, या भारताच्या दाव्यावर आज "ब्रिक्‍स' परिषदेमध्ये शिक्कामोर्तब झाले. "ब्रिक्‍स' परिषदेच्या जाहीरनाम्यामध्ये जगभरात हिंसाचार पसरविणाऱ्या दहशतवादी संघटनांच्या यादीत पाकिस्तानमधील लष्करे तैयबा आणि जैशे महंमद या संघटनांचा समावेश करण्यात आला.

पाकचे पाठबळ असल्याच्या भारताच्या दाव्याला पुष्टी

शियामेन : दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये आश्रय दिला जातो, या भारताच्या दाव्यावर आज "ब्रिक्‍स' परिषदेमध्ये शिक्कामोर्तब झाले. "ब्रिक्‍स' परिषदेच्या जाहीरनाम्यामध्ये जगभरात हिंसाचार पसरविणाऱ्या दहशतवादी संघटनांच्या यादीत पाकिस्तानमधील लष्करे तैयबा आणि जैशे महंमद या संघटनांचा समावेश करण्यात आला.

दहशतवादाविरोधात कठोर कारवाईची आवश्‍यकता व्यक्त करणारा जाहीरनामा आज "ब्रिक्‍स' परिषदेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला. या परिषदेला यजमान चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, ब्राझीलचे अध्यक्ष मिशेल टिमर आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी दहशतवादी कारवायांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत या कारवाया थोपविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निश्‍चय केला. 43 पानांच्या "शियामेन जाहीरनाम्या'त अफगाणिस्तानमधील हिंसाचार तातडीने थांबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. अफगाणिस्तानमध्ये तालिबान, इसिस, अल कायदा आणि तिच्याशी संलग्न संघटना, हक्कानी नेटवर्क, लष्करे तैयबा, जैशे महंमद, तेहरीके तालिबान पाकिस्तान आणि हिज्ब उत-ताहरीर या दहशतवादी संघटना हिंसाचार घडवत असल्याबद्दल जाहीरनाम्यामध्ये काळजी व्यक्त करण्यात आली.

"ब्रिक्‍स'च्या या नवव्या परिषदेमध्ये सदस्य देशांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आणि त्याची पाठराखण करणाऱ्या सर्वांचा निषेध करण्यात आला. "कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचे समर्थन करता येणार नाही. दहशतवादी कारवाया करणारे, त्या घडवून आणणारे आणि दहशतवाद्यांची पाठराखण करणारे या सर्वांना हिंसाचारासाठी जबाबदार ठरवून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्‍यक आहे,' असे जाहीरनाम्यात म्हटले आहे. दहशतवादाला विरोध करण्याची आणि तो नष्ट करण्याची जबाबदारी प्रत्येक देशाची असून, "ब्रिक्‍स' देशांनी दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवावे, असे मतही या वेळी मांडण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनीही दहशतवादाच्या समस्येचा मुद्दा अत्यंत ठामपणे मांडला. त्यांनी मांडलेल्या भूमिकेला इतर देशांनीही पाठिंबा दिला. "ब्रिक्‍स'मध्ये प्रथमच हिंसाचार घडविणाऱ्या दहशतवादी संघटनांचा स्पष्टपणे उल्लेख आल्याने भारताच्या भूमिकेचा हा विजय असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव प्रीती सरन यांनी पत्रकारांना सांगितले.

चीनच्या भूमिकेत बदल
हिंसाचार पसरविणाऱ्या संघटनांच्या यादीमध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचाही उल्लेख असल्याने चीनच्या पाकिस्तानबाबतच्या भूमिकेमध्ये थोडासा बदल झाल्याचेही या वेळी दिसून आले. गोव्यामध्ये झालेल्या गेल्या परिषदेवेळी चीनने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांची जाहीरनाम्यात नावे समाविष्ट करण्यास विरोध केला होता. चीनच्या भूमिकेत झालेल्या या बदलामुळे आता पाकस्थित मसूद अझर या दहशतवाद्याचे नाव आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत घालण्याच्या भारताच्या भूमिकेला असलेला विरोध चीन कायम ठेवणार का, याकडे लक्ष राहणार आहे.

"ब्रिक्‍स'मधील ठळक घडामोडी
- "ब्रिक्‍स' देशांदरम्यान आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य वाढविण्यासाठी चीनकडून 7.6 कोटी डॉलर
- "ब्रिक्‍स'च्या विकास बॅंकेसाठीही चाळीस लाख डॉलरची चीनकडून मदत
- उत्तर कोरियाने घेतलेल्या अणुचाचणीचा "ब्रिक्‍स' देशांकडून निषेध
- उत्तर कोरियाकडे अणुचाचणीबद्दल अधिकृत निषेध नोंदविल्याची चीनकडून माहिती.
- मोदी-जिनपिंग द्विपक्षीय चर्चा शक्‍य असल्याचे चीन सरकारचे म्हणणे
- जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या चर्चेत परस्पर सहकार्य वाढविण्यास सहमती

Web Title: brics summit 2017 lashkar e taiba jaish e mohammad and pakistan