esakal | जादा विमान उड्डाणास ब्रिटनच्या हिथ्रो विमानतळाचा नकार

बोलून बातमी शोधा

britain heathrow airport
जादा विमान उड्डाणास ब्रिटनच्या हिथ्रो विमानतळाचा नकार
sakal_logo
By
पीटीआय

लंडन - कोरोना संसर्गाचा फैलावामुळे ब्रिटनने भारताला प्रवासाच्या दृष्टीने ‘रेड लिस्ट’मध्ये सामील केलेले असताना आता ब्रिटनच्या हिथ्रो विमानतळ प्रशासनाने अडचणीत भर घातली आहे. हिथ्रो विमानतळाने भारतातून जादा उड्डाणाला परवानगी नाकारली आहे. ‘कोविडच्या निर्बंधामुळे नागरिक मायदेशी परतण्याची घाई करत असताना हिथ्रो विमानतळ प्रशासनाने त्यास ब्रेक लावला आहे.

भारतात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता ब्रिटनने भारताला ‘रेड लिस्ट’मध्ये टाकले आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी म्हटले की, भारतात नवीन व्हेरियंटचे शंभराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. भारताला रेड लिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय कठीण आहे, परंतु सध्याच्या काळात महत्त्वाचा आहे. यानुसार जी व्यक्ती दहा दिवसांपासून भारतात राहत आहे आणि ती ब्रिटन किंवा आयर्लंडची रहिवासी नसेल तर त्यास देशात प्रवेश दिला जाणार नाही. ते म्हणाले की, पासपोर्ट तपासणीसाठी मोठी रांग लागते आणि ही बाब जोखमीची आहे. चार विमान कंपन्यांनी भारतातून जादा आठ उड्डाणांची परवानगी मागितली होती.

हेही वाचा: भारतीयांसाठी 'कैलासा'चे दरवाजे बंद; नित्यानंदने घेतला निर्णय

विमान वाहतुकीत कपात

मेलबर्न : कोरोना संसर्गाचा अधिक प्रभाव असलेल्या भारतासारख्या देशांमधून येणाऱ्या विमान उड्डाणांची संख्या कमी करण्याच्या निर्णय ऑस्ट्रेलिया सरकारने घेतला आहे. जगभरात रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने एकूण ३० टक्के विमान प्रवासी वाहतूक कमी करण्याचे ठरविले आहे.

संसर्गाचा अधिक धोका असलेल्या देशांची यादी अद्याप ऑस्ट्रेलिया सरकारने अंतिम केली नसली तरी भारतातील सध्याची भयावह परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे येथील माध्यमांनी सांगितले. ‘भारतात होणारा प्रवास कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या आणि इतर काही देशांमध्ये प्रवास केल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो. अशा धोकादायक देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी कडक कोरोना नियम बनविले जाणार आहेत,’ असे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले. तसेच देशाच्या इतर भागांमधून येणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांसाठीही मायदेशात प्रवेश करतानाचे नियम कडक करण्यात आले आहेत.