ब्रिटनच्या संसदेत शेतकरी आंदोलनाचा मुद्दा; PM जॉन्सन यांचं धक्कादायक उत्तर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 December 2020

बोरिस जॉन्सन यांच्या या असंबंध आणि विचित्र उत्तराने सर्वांना धक्का बसला. 

लंडन : ब्रिटनच्या संसदेत काल बुधवारी भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा झालेली पहायला मिळाली. त्यांच्या संसदेत आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा उठलेला पहायला मिळाला. यावर ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांनी मत व्यक्त केलेलं देखील पहायला मिळालं. मात्र, त्यांच्या मताने सर्वांनाच आश्यर्याचा धक्का बसलेला पहायला मिळाला. लेबर पार्टीचे ब्रिटीश-शिख खासदार तनमनजीत सिंह धेसी यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना भारतातील शेतकरी आंदोलनाबाबतच्या भुमिकेवर प्रश्न विचारला. यावर जॉन्सन हे संभ्रमित झालेले पहायला मिळाले. जॉन्सन यांनी त्यांच्या या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं की, भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेल्या वादावर द्विपक्षीय चर्चेतून तोडगा निघू शकतो. त्यांच्या या असंबंध आणि विचित्र उत्तराने सर्वांना धक्का बसला. यावर आता ब्रिटनच्या सरकारकडून स्पष्टीकरण देखील आलं आहे.

बोरिस जॉन्सन यांच्या या विचित्र उत्तरावर आश्यर्याचा धक्का बसलेल्या खासदार धेसी यांनी लगेचच सोशल मीडियावर याबाबत आश्चर्य व्यक्त करणारं ट्विट टाकलं. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय की, भारतात कृषी कायद्यांविरोधात शांततेने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला दडपण्यासाठी सरकारकडून अमानुषरित्या पाण्याचे तीव्र फवारे, अश्रूधूर अशा मार्गांचा वापर केला जात आहे. प्रत्येकाला शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवण्याचा मूलभूत अधिकार आहे. पण आमच्या पंतप्रधानांना जर ते कशाविषयी बोलताहेत हे माहित असतं तर जरा बरं झालं असतं. 

सारं जग पाहतंय. हा विषय मोठा आहे. जगभरातील हजारो लोक या मुद्यासाठी आंदोलन करत आहेत. बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार लंडनमधून देखील भारतातील शेतकऱ्यांचा समर्थनार्थ आंदोलन झाले आहे. मात्र, बोरिस जॉनसन यांच्या याविषयावरील प्रतिक्रियेमुळे घोर निराशा झाली आहे.  यावर उत्तर म्हणून बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं की, भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानच्या कोणताही वाद उभय देशातील चर्चेने सुटू शकतो.

जेव्हा यावर स्पष्टीकरण मागितले गेले तेव्हा ब्रिटन सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, पंतप्रधानांचा गैरसमज झाला आहे आणि भारतातील आंदोलनाबाबत ब्रिटनचे परराष्ट्र मंत्रालय लक्ष ठेवून आहे. पंतप्रधानांच्या ऐकण्यात काहीतरी चूक झाल्याने हा गोंधळ झाला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. भारत सरकार शेतकरी आंदोलनाला कसं हाताळतंय हा अंतर्गत मामला आहे, मात्र आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

हेही वाचा - ब्रिटननंतर कॅनडामध्ये 'Pfizer लशी'ला मान्यता

धेसी यांनी ब्रिटनच्या संसदेत भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मुद्दा उठवत ब्रिटनच्या पंतप्रधानांना उद्देशून म्हटलं होतं की, भारतात अत्यंत क्रूररित्या शेतकरी आंदोलनाला सरकारकडून दडपलं जात आहे. तरीही शेतकरी या पोलिसांना खायला घालून चांगुलपणाचे प्रदर्शन करताना दिसत आहेत. प्रत्येकाला शांततेने निषेध नोंदवण्याचा मूलभूत अधिकार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून तुम्ही भारताच्या पंतप्रधानांकडे आमच्या भावना पोहचवून या आंदोलनाविषयी भारत सरकारकडे चिंता व्यक्त कराल का? असं विचारलं होतं.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: british pm boris johnson weird reply on farmers protest asked by Tanmanjeet Singh Dhesi MP

टॉपिकस