कोरोनानंतर चीनमध्ये ब्रुसेलोसिसचं थैमान; हजारो रुग्ण सापडल्याने खळबळ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

चीनच्या वायव्य भागात या रोगाची अनेकांना बाधा झाली आहे. ब्रुसेला या विषाणूमुळे होणाऱ्या या रोगाचे हजारो रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत आहे. 

ब्रुसेलोसिस (brucellosis) नावाचा नवा आजार चीनमध्ये सध्या थैमान घालत असल्याची माहिती समोर आली आहे. चीनच्या वायव्य भागात या रोगाची अनेकांना बाधा झाली आहे. ब्रुसेला या विषाणूमुळे होणाऱ्या या रोगाचे हजारो रुग्ण आढळून आल्याची माहिती मिळत आहे. 

काय आहे वृत्त?
ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने हि बातमी समोर आणली आहे. गान्सू या प्रांतातील लॅन्झू शहरातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या रोगाचे 3,235 रुग्ण आढळून आले आहेत. 24 जुलै 2019 ते 20 ऑगस्ट यादरम्यान एका औषधनिर्मिती करणाऱ्या एका कारखान्यामध्ये लस निर्माण करण्याचे काम केले जात होते. या प्रक्रियेतूनच हा विषाणू  पसरला असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - धक्कादायक! कोरोनाचे अर्ध्याहून जास्त डोस श्रीमंत देशांनी केलेत बुक

कसा पसरला विषाणू?

लसनिर्मितीचा कारखाना हा लॅन्झू येथील प्राणी संशोधन केंद्राजवळ होता. प्राण्यांना होणाऱ्या आजारावर उपचार करण्यासाठी म्हणून ब्रुसेला या विषाणुंचा वापर औषधनिर्मिती करण्यासाठी करण्यात येत होता. ही प्रक्रिया सुरु असताना या कारखान्यातील धूराचे आणि गॅसचे लोट हे कसलीच प्रक्रिया न करता कारखान्याबाहेर सोडण्यात आले. आणि त्यातूनच ब्रुसेला नावाचा विषाणू बाहेर पसरला. या विषाणूची बाधा परिसरातील लोकांना झाली आहे. हवेमध्ये थेट सोडण्यात आलेल्या गॅसमधून हा विषाणू दूरवर पसरला. या गॅसमध्ये बॅक्टेरिया आणि प्रक्रिया करण्यात आलेली रसायनेही होती. 

काय आहे आजार?

ब्रुसेलोसिस या आजारामध्ये डोकं दुखणे, ताप येणे. घशात खवखव होणो अशी लक्षणे दिसून येतात. या विषाणूच्या संसर्गामुळे मानवी प्रजनन क्षमतेवर विपरित परिणाम होतो, असेही चीनच्या आरोग्य खात्याने म्हटलं आहे. गुरं, शेळ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या या आजाराला मेडिटेरियन फिव्हर असंही म्हटलं जातं. वेळीच उपचार मिळाला नाही तर रुग्ण दगावू शकतो. 

हेही वाचा - काय आहे जगभरातील लशींची अवस्था

काय आहेत उपचार?
 योग्य औषधोपचारांच्या सहाय्याने रुग्ण बरा होऊ शकतो. दिर्घकालीन उपचारानंतरच हा आजार बरा होण्याची शक्यता आहे. संसर्गित प्राण्याला लस देणे, त्यांना मारुन टाकणे यातून संसर्ग रोखता येतो. असं युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोलने म्हटलं आहे. 

चीनमधील सरकारी वृत्तसंस्था झिंग्वाने दिलेल्या माहितीनुसार झॉनगुम लॅन्झू येथील एका औषधनिर्मिती कारखान्यातून संसर्गास सुरवात झाल्याचे वृत्त नोव्हेंबर महिन्यात आलं होतं. डिसेंबरपर्यंत फक्त 181 रुग्ण या ब्रुसेलोसिसचे होते. याआधीही म्हणजे 1980 च्या दशकात चीनमध्ये ब्रुसेलोसिसचा संसर्ग घडल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brucellosis disease found in china new disease