फायजरची लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याला आठवड्याभरातच कोरोनाची लागण

टीम ई सकाळ
Wednesday, 30 December 2020

फायजरच्या कोरोना व्हॅक्सिनचे डोस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले जात आहे. दरम्यान लस दिल्याच्या एक आठवड्यानंतर एक आरोग्य कर्मचाऱी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेतील कॅलिफोर्नियात फायजरच्या कोरोना व्हॅक्सिनचे डोस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले जात आहे. दरम्यान लस दिल्याच्या एक आठवड्यानंतर एक आरोग्य कर्मचाऱी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. मॅथ्यू डब्ल्यू नावाचा आरोग्य कर्मचारी दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये नर्सचं काम करतो. त्याला 18 डिसेंबरला कोरोनाची लस देण्यात आली होती. याची माहिती त्याने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली होती. तेव्हा कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम झाले नसल्याचंही त्याने सांगितलं होतं. 

एबीसी न्यूजच्या रिपोर्टनुसार व्हॅक्सिन दिल्यानंतर 6 दिवसांनी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला आरोग्य कर्मचारी आजारी पडला. त्याला थंडी वाजायला लागली. त्यानंतर शरीरात वेदना सुरू झाल्या आणि थकवाही जाणवू लागला. ख्रिसमसनंतर रुग्णालयात दाखल होऊन त्याने कोरोना चाचणी करून घेतली. 

हे वाचा - ऑक्सफर्ड लशीला ब्रिटनने दिली मान्यता; फायझरनंतर कोविशिल्डचे होणार लशीकरण

अमेरिकेतील साथरोग तज्ज्ञ रेमर्स यांनी सांगितलं की, आम्हाला व्हॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायलमधून हे समजलं होतं की कोरोनाविरुद्ध इम्युनिटी तयार होण्यासाठी 10 ते 14 दिवसांचा वेळ लागू शकतो. माझ्या मते कोरोना व्हॅक्सिनचा पहिला डोस तुम्हाला 50 टक्के सुरक्षित ठेवतो तर 95 टक्के सुरक्षेसाठी दुसऱ्या डोसची गरज असते. याआधी अमेरिकेत सातत्यानं कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यानं फायजरच्या कोरोना व्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली होती. 

व्हॅक्सिन अॅडव्हायजरी समूहाने 17-4 अशा फरकाने निर्णय घेतला की फायजरचा डोस 16 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी सुरक्षित आहे. फायजरने दावा केला होता की, त्यांची व्हॅक्सिन 95 टक्के प्रभावी आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोरोनाच्या व्हॅक्सिनला लवकरात लवकर मंजुरी देण्यासाठी दबाव टाकत होते. 

हे वाचा - कोरोनापासून वाचण्यासाठी पाणी पिणं पडलं महागात; आयसीयूत व्हावं लागलं दाखल

कोरोनाची व्हॅक्सिन देण्याआधी संबंधितांना व्हॅक्सिनमधील घटकांपासून अॅलर्जी आहे की नाही हे पाहण्यास सांगितलं होतं. एफडीएने त्यांच्या गाइडलाइनमध्ये म्हटलं होतं की, ज्यांना अॅलर्जीचा त्रास आहे त्यांना फायजर - बायोटेकची व्हॅक्सिन देऊ नये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: california-nurse-tests-corona-positive after pfizer vaccine dose